दाभ्यात महाराष्ट्रातील पहिली ‘शेतकरी सरण परिषद
marathinews24.com
पुणे – शेतकऱ्यांच्या घरात चूल पेटण्याऐवजी सरण पेटण्याची वेळ आली आहे. कर्जबाजारीपणा, दुष्काळ, नापिकी आणि आर्थिक विवंचनेमुळे शेतकरी हतबल होत असताना सरकार मात्र मोठमोठ्या उत्सवांच्या नियोजनात व्यस्त आहे. या व्यवस्थेला जागे करण्यासाठी कळंब तालुक्यातील दाभा येथे महाराष्ट्रातील पहिली आगळीवेगळी ‘शेतकरी सरण परिषद’ पार पडली. ‘चला, बाप वाचवूया!’ या ब्रीदवाक्याखाली झालेल्या या परिषदेतून शेतकऱ्यांचे प्रश्न राज्याच्या केंद्रस्थानी आणण्याचा आणि गावागावांत हा लढा उभा करण्याचा निर्धार करण्यात आला.
बाणेरमध्ये सुरांची मैफल रंगली; ‘सुरश्वेताच्या स्वरांनी रसिकांना घातली मोहिनी – सविस्तर बातमी
‘एक पोरगा सरणावर असताना दुसऱ्या पोराचं लग्न थाटामाटात करणारा सरकार नावाचा बाप भानावर आहे का?’ असा थेट सवाल उपस्थित करीत परिषदेतून सरकारच्या धोरणांवर जोरदार टीका करण्यात आली. एका बाजूला शेतकरी आत्महत्यांचे संकट गडद होत असताना दुसऱ्या बाजूला आगामी कुंभमेळ्यासाठी हजारो कोटींच्या खर्चाच्या चर्चा सुरू आहेत. धार्मिक भावना आणि उत्सवांना विरोध नसून शेतकऱ्यांच्या जगण्याला, त्यांच्या मुलांच्या शिक्षणाला आणि भविष्याला प्राधान्य मिळाले पाहिजे, अशी भूमिका यावेळी मांडण्यात आली.
ग्रामीण भागातील कर्जव्यवस्थेतील आर्थिक पिळवणुकीचा मुद्दाही परिषदेत ऐरणीवर आला. बिगर बँकिंग वित्तीय संस्थांकडून ३० ते ४० टक्क्यांपर्यंत व्याज आकारले जात असल्याच्या तक्रारींचा उल्लेख करीत अशा कर्जव्यवस्थेवर कठोर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांना पारदर्शक, कायदेशीर आणि सुलभ कर्जपुरवठा उपलब्ध करून द्यावा, अशी मागणीही करण्यात आली.
शेतमालाच्या बाजारभावातील अनिश्चितता, आयात-निर्यात धोरणातील बदल आणि कृषी क्षेत्राला मिळणारे धोरणात्मक पाठबळ या विषयांवरही चर्चा झाली. OECD च्या कृषी धोरणविषयक निरीक्षणांच्या पार्श्वभूमीवर भारतीय कृषी क्षेत्रातील समस्यांकडे सरकारने गांभीर्याने पाहावे, अशी भूमिका मांडण्यात आली. त्याचबरोबर ग्रामीण भागातील वाढती व्यसनाधीनता रोखण्यासाठी दारूमुक्त गाव आणि व्यसनमुक्त ग्रामीण महाराष्ट्रासाठी ठोस धोरण राबविण्याची मागणी करण्यात आली.
शेतकऱ्यांच्या वर्गणीतून उभी राहिली परिषद!
या परिषदेचे वैशिष्ट्य म्हणजे कोणत्याही राजकीय पक्षाचे आर्थिक पाठबळ किंवा मोठ्या प्रायोजकाची मदत न घेता शेतकऱ्यांनी स्वतःच्या वर्गणीतून हा उपक्रम उभा केला. गावातील नागरिकांनी घरातून पिठलं-भाकरी आणून पाहुणचार केला. शेतकऱ्यांनी आपल्या बापाला वाचविण्यासाठी एकत्र येत स्वाभिमानाचा आवाज बुलंद केला. त्यामुळे ही परिषद केवळ कार्यक्रम न राहता ग्रामीण भागातील शेतकरी असंतोष आणि वेदनेचे प्रतीक ठरली.
आता गावागावांत शेतकरी सरण परिषदा
दाभा येथील परिषद एका गावापुरती मर्यादित न ठेवता महाराष्ट्रातील प्रत्येक गावात, वाडी-वस्तीवर शेतकरी सरण परिषदा आयोजित करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. दुष्काळ, कर्जबाजारीपणा, शेतमालाचे बाजारभाव, कृषी धोरण, शेतकरी आत्महत्या, ग्रामीण व्यसनाधीनता आणि शेतकऱ्यांच्या मुलांचे भविष्य या प्रश्नांवर गावागावांत जनजागृती करण्यात येणार आहे. या प्रश्नांची दखल राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर घेतली जावी, यासाठीही प्रयत्न करण्याचा संकल्प करण्यात आला. या परिषदेचे संकल्पक शेतकरी पुत्र ॲड. अमोल पाटील, शिवक्रांतिवीर महेश टेळे, ओमकार इरकर, सुभाष टेळे, शिवशंकर होनराव, जवळबनचे सरपंच राजाभाऊ करपे, चेअरमन नितीन भाकरे, अंगद दोरगे, मराठवाडा मित्रमंडळ पुणेचे अध्यक्ष संतोष हावडे, पंचायत समिती सदस्य सूरज टेकाळे, डॉ. प्रकाश टेकाळे, शेतकरी युवा नेते कुलदीप करपे, संभाजी ब्रिगेडचे अध्यक्ष राहुल खोडसे, शेतकरी पुत्र राजाभाऊ पाटील, संतोष शिंदे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष तानाजी पाटील, विष्णू काळे, स्वाभिमानी शेतकरी युवा अध्यक्ष सचिन टेळे, दाभा उपसरपंच प्रकाश टेळे, ग्रामपंचायत सदस्य सुधाकर टेळे, शामराव पाटील, बालासाहेब टेळे, किरण टेळे आदी उपस्थित होते.
‘आमचा लढा कोणत्याही धर्माविरुद्ध किंवा उत्सवाविरुद्ध नाही; तर शेतकऱ्याला जगण्याचा अधिकार नाकारणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आहे. शेतकऱ्यांचा बाप वाचला पाहिजे आणि ग्रामीण महाराष्ट्राचे अस्तित्व टिकले पाहिजे,’ असा निर्धार या परिषदेतून व्यक्त करण्यात आला.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शेतकरी नेते रामजीवन बोंदर होते.
कार्यक्रमाच्या यशस्वितेसाठी इंद्रजीत टेळे, भैरवनाथ सावंत, आकाश टेळे, प्रदीप टेळे, वेदांत टेळे, उमाकांत इरकर, यशराज टेळे आदींनी परिश्रम घेतले.




















