‘पुस्तक’ प्रतिकृतीतून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत वाचन संस्कृतीचा जागर

'पुस्तक' प्रतिकृतीतून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड करत वाचन संस्कृतीचा जागर

17 हजार वाचकांच्या सहभागातून पुण्याची वाचनपरंपरा जगासमोर

marathinews24.com

पुणे – खडकी शिक्षण संस्थेच्या टिकाराम जगन्नाथ कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात (स्वायत्त), खडकी–पुणे येथे पुणे पुस्तक महोत्सवाच्या अंतर्गत वाचनसंस्कृतीला जागतिक व्यासपीठावर नेणारा अभूतपूर्व आणि विश्वविक्रमी उपक्रम कोहिनुर ग्रुपतर्फे साकारण्यात आला. “शांतता पुणेकर वाचत आहेत” या संकल्पनेवर आधारित, वाचन चळवळीत सहभागी झालेल्या वाचकांचे पुस्तक वाचतानाचे छायाचित्र वापरून मराठी देवनागरी लिपीत ‘पुस्तक’ या शब्दाची भव्य प्रतिकृती उभारण्यात आली.

डिकाईतर्फे भव्य दिव्यांग चित्रकला स्पर्धा उत्साहात संपन्न – सविस्तर बातमी 

या अभिनव उपक्रमासाठी तब्बल 17,001 वाचकांच्या छायाचित्रांचा वापर करण्यात आला असून, या उपक्रमाची गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमध्ये अधिकृत नोंद झाली आहे. त्यामुळे पुणे पुस्तक महोत्सव, कोहिनुर ग्रुपने, खडकी शिक्षण संस्था आणि टी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात ऐतिहासिक विक्रम नोंदवला आहे. या विश्वविक्रमी उपक्रमामागील गिनीज वर्ल्ड रेकॉर्डची संकल्पना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे आणि पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे, कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांची असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे ही कल्पना प्रत्यक्षात साकार झाली.

याप्रसंगी एनपीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे यांनी आपल्या मनोगतात सांगितले की, पुणे पुस्तक महोत्सव आणि कोहिनुर ग्रुप व खडकी शिक्षण संस्थेच्या माध्यमातून उभा राहिलेला हा उपक्रम म्हणजे वाचनसंस्कृतीचे वैचारिक आंदोलन आहे. गिनीज वर्ल्ड रेकॉर्डमुळे केवळ विक्रम नोंदला गेला नाही, तर वाचनाचे सामाजिक मूल्य अधिक दृढ झाले असून, संस्थेच्या शैक्षणिक वैभवात मोलाची भर पडली आहे.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे यांनी नमूद केले की, वाचन ही केवळ अभ्यासाची प्रक्रिया नसून समाजमन घडवणारी शक्ती आहे. ‘पुस्तक’ या शब्दाची प्रतिकृती ही केवळ कलाकृती नसून ज्ञान, शांतता आणि विवेक यांची सामूहिक अभिव्यक्ती आहे. विद्यार्थ्यांना व समाजाला वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी असे उपक्रम दिशादर्शक ठरतात.

पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे यांनी सांगितले की, पुण्याची समृद्ध वाचनपरंपरा जागतिक स्तरावर नेण्याचे कार्य या उपक्रमातून झाले आहे. 17,001 वाचकांच्या सहभागातून उभा राहिलेला हा विक्रम म्हणजे वाचनचळवळीचा उत्सव असून, कोहिनुर ग्रुप व टी. जे. महाविद्यालयाने पुणे पुस्तक महोत्सवाच्या उद्दिष्टांना बळ दिले आहे.

खडकी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व कोहिनुर ग्रुपचे सर्वेसर्वा कृष्णकुमार गोयल यांनी अध्यक्षीय मनोगतात प्रतिपादन केले की, वाचन ही केवळ शैक्षणिक गरज नसून समाजात शांतता, संस्कार आणि वैचारिक प्रगल्भता निर्माण करणारी चळवळ आहे. आज कोहिनुर ग्रुपने खडकी शिक्षण संस्था व टी. जे. महाविद्यालयाच्या प्रांगणात पुणे पुस्तक महोत्सवात गिनीज वर्ल्ड रेकॉर्डद्वारे ही चळवळ जागतिक पातळीवर नेली, याचा कोहिनुर ग्रुपला अभिमान आहे.

या कार्यक्रमास पुणे पुस्तक महोत्सवाचे अध्यक्ष राजेश पांडे, एनपीटीचे अध्यक्ष मिलिंद मराठे, प्रसेनजित फडणवीस, बागेश्री मंठाळकर, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे रासेयो संचालक गणेश भामे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. संजय चाकणे, संस्थेचे सचिव आनंद छाजेड, संस्था पदाधिकारी काशिनाथ देवधर, रमेश अवस्थे, ॲड. अजय सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. तसेच संस्थेच्या सर्व विभागांचे प्रमुख, प्राध्यापकवृंद, प्राध्यापकेत्तर कर्मचारी आणि मोठ्या संख्येने विद्यार्थी या ऐतिहासिक क्षणाचे साक्षीदार ठरले.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बागेश्री मंठाळकर यांनी केले, आभार सचिव आनंद छाजेड यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. स्वामीराज भिसे यांनी केले. या विश्वविक्रमी उपक्रमाने वाचनसंस्कृतीचा जागर करत पुण्याच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक परंपरेला जागतिक ओळख मिळवून दिली, असे मत सर्व स्तरांतून व्यक्त करण्यात आले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×