दुचाकीस्वार चोरट्यांकडून तीन ठिकाणी मोबाइल हिसकावले; ४० हजार, ९० हजारांचे महागडे मोबाइल लंपास
marathinews24.com
पुणे – Kasba Peth Crime News : पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावून नेल्याची घटना कसबा पेठ, बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर परिसर, तसेच स्वारगेट भागातील डायस प्लाॅट परिसरात घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध फरासखाना पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, पसार झालेल्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत आहे. कसबा पेठेतील तांबट हौद परिसरात पादचारी तरुणाचा महागडा मोबाइल दुचाकीस्वार चोरट्यांनी हिसकावून नेल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याप्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
तरुणीची तीन लाखांची सोनसाखळी हिसकावली – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण कसबा पेठेत राहायला आहेत. १० नोव्हेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास तो कसबा पेठेतील तांबट हौद परिसरातून निघाला होता. त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्या हातातील ४० हजार रुपयांचा मोबाइल हिसकावून नेला. तरुणाने आरडा ओरडा केला. दुचाकीस्वार चोरटे पसार झाले. बुधवार पेठेतील पासोड्या विठोबा मंदिर परिसरात परगावाहून आलेल्या तरुणाकडील मोबाइल हिसकावून नेल्याची घटना गुरुवारी (१२ नोव्हेंबर) घडली. या प्रकरणी दुचाकीस्वार चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत एका तरुणाने फरासखाना पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण मूळचा कर्नाटकातील चालुक्यपुरा येथील आहे. तो कामानिमित्त पुण्यात आला आहे. गुरुवारी मध्यरात्री पावणेदोनच्या सुमारास तो पासाेड्या विठोबा मंदिर परिसरातून निघाला होता. (Kasba Peth Crime News) त्या वेळी दुचाकीस्वार चोरट्यांनी त्याच्याकडील ९० हजार रुपयांचा महागडा मोबाइल हिसकावून नेला. पादचाऱ्यांचे मोबाइल हिसकावण्याच्या दोन घटना फरासखाना पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडल्यानंतर पोलिसांनी सीसीटीव्ही चित्रीकरण तपासले. मोबाइल हिसकावणाऱ्या चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, सहायक पोलीस निरीक्षक सुरवसे तपास करत आहेत.
गुलटेकडीतील डायस प्लाॅट परिसरात पादचारी तरुणाचा १५ हजारांचा मोबाइल हिसकावून नेण्यात आल्याची घटना नुकतीच घडली. याबाबत एका तरुणाने स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून, सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.




















