दिवसाढवळ्या टोळक्याने मोबाईल चोरला, चष्माही फोडला; ट्रेकिंगसाठी टेकडीवर गेला होता परदेशी अभियंता
marathinews24.com
पुणे – ट्रेकींगसाठी टेकडीवर गेलेल्या एका कोरियन अभियंत्याला त्रिकुटाने मारहाण करून दिवसाढवळ्या लुटल्याची घटना शनिवारी १७ मे रोजी सकाळी दहाच्या सुमारास बाणेर परिसरात घडली आहे. चोरट्यांनी अभियंत्याचा मोबाइलसह रोकड चोरून नेली आहे. याप्रकरणी तिघांविरूद्ध बाणेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. पार्क सुंग हो (वय ४५) यांनी फिर्याद दिली असून, लुटमारीच्या घटनेमुळे परिसरातील परदेशी नागरिकांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. दिवसाढवळ्या ट्रेकिंग स्पॉटवर घडलेल्या घटनेमुळे पोलिसांच्या गस्तीसह देखरेखीच्या यंत्रणेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
मगरपट्टा, खराडीत घरफोडी करीत २७ लाखांचा ऐवज लंपास – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पार्क हो व्यवसायाने लँडिंग इंजिनिअर असून, तो मूळचा कोरियन देशाचा नागरिक आहे. फेब्रुवारी २०२४ पासून तो पुण्यातील बालेवाडी परिसरात कामानिमित्त राहायला आला आहे. तळेगाव एमआयडीसीतील ह्युंदाई मोटर्स इंडियामध्ये अभियंता म्हणून तो कामाला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून तो बालेवाडीतील नंदन प्रॉस्पेरा सोसायटीमध्ये कोरियन सहकार्यांसोबत राहत आहे. शनिवारी दि. १७ मे रोजी तक्रारदार पार्क सुंग हो तुकाईमाता मंदिराभोवती ट्रेकिंग करत होता.
त्यावेळी गुलाबी शर्ट आणि नाकात चांदीची कानातले घातलेल्या एकाने त्याला मागून हाक मारली. तो वळला असता, दुसर्या चोरट्याने पार्कची मागून बॅग धरली. तिसर्याने (पांढरा शर्ट घातलेला) त्याच्या पँटच्या खिशात हात घातला. त्याचा सॅमसंग एस २४ मॉडेलचा हा ७२ हजारांचा मोबाईल चोरून नेला.
चोरट्यांना विरोध करताना पार्क सुंग हो जमिनीवर पडल्यामुळे त्याचा चष्मा तुटला. त्यानंतर हल्लेखोर मोबाईल घेऊन पळून गेले. आवाज ऐकून मदतीसाठी तिघेजण घटनास्थळी पोहोचले. त्यांनी ताबडतोब १०० वर फोन करून पोलिसांना माहिती दिली. बाणेर पोलिसांनी घटनास्थळी पोहोचून पीडितेला पोलिस ठाण्यात नेले. त्यानुसार बाणेर पोलिसांनी भारतीय दंड संहिता, २०२३ च्या कलम ३(५) आणि ३०९(४) अंतर्गत तीन अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सीसीटीव्ही कॅमेर्यांच्या मदतीने आरोपींची ओळख पटवली जात आहे आणि तांत्रिक विश्लेषणकेले जात आहे. पोलीस उपनिरीक्षक रूपेश चाळके तपास करीत आहेत.