अटकेतील ७ आरोपींची चौकशी
marathinews24.com
पुणे – पार्टीत ड्रग्जचा पुरवठा करणार्यांचा शोध सुरू – मद्यधुंद पार्टी प्रकरणात आरोपींना ड्रग्जचा पुरवठा करणार्या तस्कराचा गुन्हे शाखेकडून शोध घेतला जात आहे. याप्रकरणात माजी मंत्री एकनाथ खडसे यांच्या जावयासह ७ जणांना अटक केली आहे. खराडीतील पार्टीच्या आदल्या दिवशीही स्टे बर्ड हॉटेलच्या खोलीमध्ये काहीजण येऊन गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले असून, त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. डॉ. प्रांजल मनीष खेवलकर, निखिल जेठानंद पोपटाणी, समीर फकीर महमंद सय्यद. सचिन सोमाजी भोंबे, श्रीपाद मोहन यादव, इशा देवज्योत सिंग, प्राची गोपाल शर्मा अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
अश्लीलतेचा कळस, धावत्या दुचाकीच्या टाकीवर तरूणीला बसवले – सविस्तर बातमी
पोलिसांनी पार्टी सुरू असलेल्या खराडीत छापा टाकल्यानंतर आरोपींकडून २ ग्रॅम ७० मिलीग्रॅम कोकेन, ७० ग्रॅम गांजा पदार्थ, हुक्का पात्र, १० मोबाइल , सुगंधी तंबाखू, दोन मोटारी, मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणातील आरोपींना रविवारी दि. २७ जुलैला वैद्यकीय तपासणीसाठी ससून रूग्णालयात दाखल केले होते. त्यांचे रक्त, लघवीचे नमुने घेण्यात आले असून, ससूनच्या प्राथमिक तपासणीनुसार आरोपी डॉ. खेवलकर आणि यादव यांनी मद्यप्राशन केल्याचे निष्पन्न झाले आहे. ससूनमधील मुख्य वैद्यकीय अधिकार्यांनी सर्व आरोपींचे रक्त आणि लघवीचे नमुने लाखबंद करून पोलिसांंच्या ताब्यात दिले आहेत. पोलिसांनी आरोपींच्या रक्तासह लघवीचे नमुने न्याय वैद्यकीय प्रयोगशाळेत पाठविले आहेत. त्याचा अहवाल दोन ते तीन दिवसांत मिळण्याची शक्यता आहे.
खराडीतील हॉटेलमध्ये पार्टी सुरु असून, तेथे अमली पदार्थाचे सेवन होत असल्याची माहिती २६ जुलैला पोलिसांना मिळाली होती. गुन्हे शाखेने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेत अटक केली. घटनास्थळावरून मद्याच्या बाटल्या, हुक्का पात्र, सुगंधी तंबाखू जप्त केली. टीपॉयवर सिगारेटचे पाकिट सापडले असून, त्यातील एका पुडीत कोकेन सदृश्य अमली पदार्थ मिळून आला. महिला आरोपीच्या पर्समध्ये कोकेन आणि गांजा सदृश अमली पदार्थ होते. मद्यधुंद पार्टीत अमली पदार्थाचा पुरवठा कोणी केला, अमली पदार्थ कसे आणले, याचा तपास करण्यात येत आहे. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त पंकज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार, पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड यांच्याकडून गुन्ह्याचा तपास सुरू आहे.
रोहिणी खडसे, आमदार पवार यांनी भेट टाळली
मद्यधुंद पार्टी प्रकरणाला राजकीय वळण लागले असून, आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. दरम्यान, याप्रकरणी २८ जुलैला रोहिणी खडसे, आमदार रोहित पवार पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांची भेट घेणार होते. मात्र, दोघानीही अचानक भेट घेणे टाळली असून, नेमके कारण स्पष्ट होउ शकले नाही.
आरोपींना २९ जुलैला न्यायालयात करणार हजर
मद्य पार्टी प्रकरणात अटक केलेल्या ७ जणांना रविवारी पोलिसांनी न्यायालयात हजर केले होते. त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली होती. त्यानुसार गुन्हे शाखेने दोन दिवस आरोपींची कसून चौकशी केली. कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी दि. २९ जुलैला आरोपींना न्यायालयात पुन्हा हजर केले जाणार आहे.




















