सुरक्षित वाहतूक हा सुखी जीवनाचा मार्ग – प्रदीप काळे
marathinews24.com
बारामती – LokSamvad 2026 : वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून वाहतूक सुरक्षा हा सुरक्षित जीवनाचा मार्ग आहे. रस्ते अपघात रोखण्यासाठी प्रत्येकाने आपली जबाबदारी ओळखून वाहतुकीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन वाहतूक शाखेचे प्रदीप काळे यांनी केले.
उपमहापौर परशुराम वाडेकर यांच्या प्रमुख गणेश मंडळांना भेटी – सविस्तर बातमी
पुणे जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त आयोजित ‘लोकसंवाद-२०२६’ LokSamvad 2026 उपक्रमांतर्गत भिगवण चौकातील श्री सिद्धी गणेश ट्रस्ट व मंडळ येथे रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांबाबत आयोजित संवाद कार्यक्रमात काळे नागरिकांशी संवाद साधत होते.
रस्ते वाहतूक सुरळीत व सुरक्षित ठेवण्यासाठी महाराष्ट्र राज्य महामार्ग वाहतूक पोलीस तसेच मोटार वाहन कायद्यानुसार निर्धारित नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. दुचाकी चालविताना तसेच मागे बसताना हेल्मेटचा वापर करावा. चारचाकी वाहनातून प्रवास करताना सीटबेल्टचा वापर करणे सुरक्षेच्या दृष्टीने अत्यावश्यक आहे. दारू अथवा अंमली पदार्थांचे सेवन करून वाहन चालवू नये, वाहनाची वेगमर्यादा पाळावी आणि वाहन चालविताना मोबाईलचा वापर टाळावा, असे त्यांनी सांगितले.
LokSamvad 2026 वाहन चालविताना वैध वाहन चालविण्याचा परवाना, नोंदणी प्रमाणपत्र, वाहन विमा आणि प्रदूषण नियंत्रण प्रमाणपत्र (पीयूसी) यांसह आवश्यक कागदपत्रे सोबत ठेवावीत. वाहतूक सिग्नलचे पालन करणे, रस्ता ओलांडताना आवश्यक खबरदारी घेणे, स्कूल बस व रिक्षातून प्रवास करताना दक्षता बाळगणे तसेच रस्त्यावरील सूचना फलकांवरील निर्देशांचे पालन करणे गरजेचे असल्याचेही काळे यांनी सांगितले.
रस्ता सुरक्षा ही केवळ वाहतूक यंत्रणेची जबाबदारी नसून प्रत्येक नागरिकाच्या सुरक्षिततेशी संबंधित सामूहिक जबाबदारी आहे. वाहतूक नियमांचे पालन करून अपघात टाळण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले.























