मोटार चालकासह दोघे अटकेत
marathinews24.com
पुणे – Pune Crime News : मोटारीजवळ श्वान आल्याने झालेल्या किरकोळ वादातून श्वान मालक महिलेवर मोटार घालून तिचा खुनाचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना बालेवाडी भागात घडली. या प्रकरणी बाणेर पोलिसांनी मोटार चालकासह दोघांना अटक केली. मनीषा संजय भंडारी (वय ४६, सध्या रा. पार्क एक्सप्रेस सोसायटी, बालेवाडी हायस्ट्रीटजवळ) असे जखमी झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मोटार चालक दिनेश दशरथ बिरादार (वय २३, रा. ऋषीकेश बालवडकर चाळ, बालेवाडी), प्रशांत नवनाथ भोंडवे (वय २५, रा. निखील बालवडकर चाळ, बालेवाडी) यांना अटक करण्यात आली. याबाबत भंडारी यांनी बाणेर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपींविरुद्ध खुनाचा प्रयत्न, तसेच मोटार वाहन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मारहाण केल्याने श्वानाचा मृत्यू – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी महिला मूळच्या अहिल्यानगरमधील आहेत. १६ सप्टेंबर रोजी रात्री साडेआठच्या सुमारास श्वानाला घेऊन फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडल्या होत्या. Pune Crime News बालेवाडीतील दसरा चौकाजवळ आरोपी बिरादार आणि भाेंडवे हे मोटार घेऊन थांबले होते. त्या वेळी श्वान मोटारीजवळून गेले. तेव्हा श्वान चावतो का ? अशी विचारणा आरोपींनी केली. तेव्हा भंडारी यांनी श्वान चावत नसल्याचे सांगितले. भंडारी यांनी मोटारीत डोकावून पाहिले. तेव्हा मोटारीतील एक जण दारू पित असल्याचे त्यांनी पाहिले. ही दारू पिण्याची जागा नाही, असे सांगून भंडारी श्वानाला घेऊन तेथून निघून गेल्या.
बालेवाडीतील दसरा चौकाजवळ असलेल्या मैदानात त्या गेल्या. तेव्हा मोटार चालक आणि साथीदार तेथे आले. मोटारीत त्यांनी मोठ्या आवाजात गाणी लावली होती. तेथून भंडारी काही अंतरावर गेल्या. तेथील एका इमारतीबाहेर त्या थांबल्या होत्या. तेव्हा मोटार चालक आणि साथीदार तेथे आले. दोघांनी महिलेला शिवीगाळ केली. अचानक मोटार मागे घेऊन महिलेच्या अंगावर घातली, असे महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत यांनी घटनास्थळी भेट दिली. सहायक पोलीस निरीक्षक अनिल केकाण तपास करत आहेत.
श्वान भुंकल्याने दोन महिलांना मारहाण
Pune Crime News श्वान भुंकल्याने दोन महिलांना गजाने मारहाण करण्यात आल्याची घटना वाघोली परिसरात घडली. या प्रकरणी दोघांविरुद्ध गंभीर दुखापत केल्या प्रकरणी गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत जयश्री रामचंद्र चव्हाण (वय २७, रा. वाघमारे वस्ती, वाघोली) यांनी वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, ताराचंद काळूराम चव्हाण, हिरामण काळूराम वाघमारे (दोघे रा. वाघमारे वस्ती, वाघोली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चव्हाण यांनी पाळलेले श्वान आरोपीवर भुंकले होते. त्या वेळी एका आरोपीने श्वानाच्या अंगावर दुचाकी घातली होती. या कारणावरुन चव्हाण यांनी आरोपींना जाब विचारला. या कारणावरुन १५ सप्टेंबर रोजी रात्री दहाच्या सुमारास आरोपींनी फिर्यादी चव्हाण आणि त्यांच्या बहिणीला शिवीगाळ करुन मारहाण केली. त्यांना गजाने मारहाण केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस हवालदार सानप तपास करत आहेत.






















