सेवा सेतू शिबिरांसह ‘नमो सेवागाथा’, अंगणवाडी उत्सव, आरोग्य व जनजागृती उपक्रमांचे आयोजन
marathinews24.com
पुणे – शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या शासकीय सेवा पात्र लाभार्थ्यांपर्यंत सुलभतेने पोहोचविण्यासाठी पुणे जिल्ह्यात १७ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०२६ या कालावधीत ‘सेवा संकल्प अभियान’ Seva Sankalp Abhiyan राबविण्यात येत आहे. अभियानांतर्गत नागरिकांना प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्याबरोबरच स्थानिक गरजेनुसार विविध लोकाभिमुख उपक्रम राबविण्यात येणार आहेत.
एस. एस. नगरकर ज्वेलर्सच्या भव्य दालनाचे बाणेरमध्ये उद्घाटन – सविस्तर बातमी
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी अभियान केवळ कार्यक्रमांच्या आयोजनापुरते मर्यादित न ठेवता पात्र नागरिकांना शासनाच्या योजनांचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देण्यावर भर देण्याच्या सूचना विभागांना दिल्या आहेत. सर्व विभागांनी परस्पर समन्वयाने आणि कालबद्ध पद्धतीने अभियानाची अंमलबजावणी करावी, असे निर्देश देण्यात आले आहेत.
अभियानाच्या कालावधीत पुणे जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यात ‘सेवा सेतू’ शिबिरांचे आयोजन करण्यात येणार आहे. या माध्यमातून विविध शासकीय योजना, प्रमाणपत्रे आणि नागरिकांना आवश्यक असलेल्या सेवांची माहिती व सुविधा एकाच ठिकाणी उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे. पात्र लाभार्थ्यांची ओळख करून त्यांना संबंधित योजनांचा थेट लाभ मिळवून देण्यावर भर राहणार आहे.
२ ऑक्टोबर २०२६ रोजी प्रत्येक तालुक्यात ‘नमो सेवागाथा’ कार्यक्रम आयोजित करण्याची तरतूद करण्यात आली आहे. शाळा, महाविद्यालये आणि ग्रामपंचायत स्तरावर कला व नाट्य पथकांच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांत स्थानिक कलाकार, विद्यार्थी व शिक्षकांचा सहभाग, सांस्कृतिक कार्यक्रम, शासनाच्या योजनांवरील माहितीपर सादरीकरण तसेच उत्कृष्ट विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान यांचा समावेश करता येणार आहे. शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशांनुसार हा कार्यक्रम तालुकास्तरावर घेणे आवश्यक आहे.
Seva Sankalp Abhiyan अभियानांतर्गत ‘अंगणवाडी उत्सव’ आयोजित करून महिला व बालकांचे आरोग्य, पोषण आणि संबंधित विषयांबाबत जनजागृती करण्यात येणार आहे. अंगणवाडी सेविका, मदतनीस तसेच आशा कार्यकर्त्यांच्या योगदानाची दखल घेत त्यांचा सन्मान करण्याचेही नियोजन आहे.
स्थानिक गरजेनुसार अभियानांतर्गत रक्तदान शिबिरे, आरोग्य तपासणी, योग व ध्यान, स्वच्छता उपक्रम, प्लास्टिकमुक्ती जनजागृती, महिला आरोग्य व स्वच्छता, पोषण व ॲनिमिया जनजागृती यांसारखे उपक्रम घेण्यात येणार आहेत.
याशिवाय अवयवदान संकल्प, व्यसनमुक्ती जनजागृती, रस्ता सुरक्षा, जलसंधारण व जलस्रोत स्वच्छता, कचरा वर्गीकरण व कंपोस्टिंग, सायबर सुरक्षा, ‘फिट इंडिया’अंतर्गत क्रीडा उपक्रम, दिव्यांगजन सहयोग आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी डिजिटल साक्षरता यांसारख्या उपक्रमांचे स्थानिक गरजेनुसार नियोजन करण्याच्या सूचना आहेत.
शालेय शिक्षण विभागाच्या निर्देशानुसार शासकीय, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या तसेच अनुदानित व विनाअनुदानित शाळांमध्ये ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेवर आधारित चित्रकला व वक्तृत्व स्पर्धा घेण्यात येणार आहेत. विद्यार्थ्यांना शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजनांची माहिती देण्याबरोबरच त्यांच्या कल्पनाशक्तीला व अभिव्यक्तीला संधी देण्यात येणार आहे.
शाळास्तरावरील उत्कृष्ट चित्रे व वक्तृत्व सादरीकरणांची पुढील स्तरावर निवड करून जिल्हास्तरावर प्रदर्शन आयोजित करण्याचे निर्देश आहेत. या उपक्रमांत विद्यार्थ्यांचा सहभाग ऐच्छिक राहणार आहे.
‘जल, जन आणि सेवा संकल्प यात्रा’ पुणे जिल्ह्यातून जाणार असून यात्रेच्या मार्गावर स्वागतस्थळे, संबंधित कार्यक्रम आणि आवश्यक सुविधांचे नियोजन करण्यात येणार आहे. यात्रेच्या ठिकाणी एलईडी स्क्रीनद्वारे माहितीपट दाखविण्याची व्यवस्थाही करण्याच्या सूचना आहेत.
अभियानादरम्यान केंद्र व राज्य शासनाच्या विविध योजनांची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासोबतच पात्र लाभार्थ्यांचा शोध घेऊन त्यांना योजनांचा लाभ मिळवून देणे हा प्रमुख उद्देश आहे. विद्यार्थ्यांना आवश्यक प्रमाणपत्रे उपलब्ध करून देणे, करिअर समुपदेशन, वंचित मुलांना शैक्षणिक सहकार्य तसेच ‘व्होकल फॉर लोकल’सारखे उपक्रमही स्थानिक गरजेनुसार राबविण्याच्या सूचना आहेत.
अभियानातील उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्याबरोबरच त्यांचे छायाचित्र, ध्वनिचित्रफीत आणि रील्सच्या माध्यमातून दस्तऐवजीकरण करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच योजनांचा लाभ घेतलेल्या नागरिकांच्या प्रतिक्रिया आणि प्रभावी यशोगाथा संकलित करण्यावरही भर देण्यात आला आहे.
सेवा संकल्प अभियानाच्या माध्यमातून शासनाच्या योजना व सेवा नागरिकांच्या अधिक जवळ नेण्याचा प्रयत्न करण्यात येत असून, सर्व संबंधित विभागांनी परस्पर समन्वयाने काम करून अभियान लोकाभिमुख पद्धतीने राबवावे. शासकीय यंत्रणेसोबत नागरिक, विद्यार्थी, स्वयंसेवी संस्था आणि विविध सामाजिक घटकांचा सहभाग वाढवून अभियानाचे उद्दिष्ट साध्य करण्यावर भर देण्यात येणार आहे.






















