मुंढव्यातील घटना; तिघे अटकेत
marathinews24.com
पुणे – बेकायदा बाळगलेल्या पिस्तूल मित्रांना दाखविताना झालेल्या गोळीबारात एक अल्पवयीन युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मुंढव्यातील केशवननगर भागात घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली. त्यांच्या बरोबर असलेल्या अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याबाबत अल्पवयीनाने मुंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावर पुन्हा अपघात – सविस्तर बातमी
सक्षम युवराज गायकवाड (वय १९), ओम दुर्गा गायकवाड (वय १९, दोघे रा. सर्वोदय काॅलनी, मुंढवा), सोनू उर्फ सोन्या मुंडे उर्फ सुमित सुजित बर्णवाल (वय २१, रा. मांजरी, हडपसर) यांना अटक करण्यात आली. त्यांच्याबरोबर असलेल्या एका अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी तरुणांची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. गोळीबारात जखमी झालेला अल्पवयीन हा हडपसर रेल्वे स्थानक परिसरातील गुलमोहोर काॅलनीत राहायला आहे. १८ मार्च रोजी रात्री साडेनऊच्या सुमारास आरोपी गायकवाड, मुंडे आणि अल्पवयीन युवक हे मुंढव्यातील केशवनगर भागात असलेल्या गुरुकृपा सोसायटीच्या परिसरात मोकळ्या जागेत थांबले होते. आरोपी मुंडे याच्याकडे देशी बनावटीचे पिस्तूल होते. आरोपी पिस्तूल हाताळत होते. पिस्तूल उगारून ते एकमेकांना दाखवित होते. त्या वेळी तेथे अल्पवयीन थांबला होता. त्यानेही पिस्तूल हाताळले. त्यानंतर मुंडे याने पिस्तूल घेतले आणि अल्पवयीनाच्या दिशेने रोखले. पिस्तूलाचा चाप ओढल्यानंतर गोळी सुटली आणि अल्पवयीनाच्या कंबरेत शिरले. या घटनेत तो गंभीर जखमी झाला.
गोळीबाराची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त डाॅ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त अतुलकुमार नवगिरे, मुंढवा पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्मिता वासनिक यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या अल्पवयीनाला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सहायक निरीक्षक पिंगुवाले तपास करत आहेत. शहरात बेकायदा पिस्तूल बाळगण्याचे प्रकार वाढले आहेत. दहशत माजविण्यासाठी सराइताकंडून पिस्तूल बाळगले जाते. दोन महिन्यांपूर्वी पुणे पोलिसांनी मध्य प्रदेश – महाराष्ट्र सीमेवर असलेल्या उमराटी गावात छापा टाकून देशी बनावटीची पिस्तुले तयार करण्याच्या कारखान्यावर छापा टाकला होता. उमराटीतून मध्यस्थांमार्फत पुण्यात पिस्तूले विक्रीसाठी पाठविले जात असल्याचे तपासात उघडकीस आले होते. माजी नगरसेवक वनराज आंदेकर, तसेच अनेक गंभीर गुन्ह्यात उमराटीतील देशी बनावटीच्या पिस्तुलांचा वापर करण्यात आल्याचे तपासात उघडकीस आले होते. पोलिसांनी या प्रकरणी देशी बनावटीची पिस्तूले तयार करणाऱ्यांना अटक करुन त्यांच्याकडून पिस्तूल, काडतुसे, तसेच यंत्र सामुग्री जप्त केली होती.





















