विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी गुन्हे दाखल
marathinews24.com
पुणे – एपीएससीचा अभ्यास करणार्या विद्यार्थ्यांना एसएम जोशी पुलावर विनापरवाना आंदोलन करणे भोवले आहे. पोलिसांनी त्यांना आंदोलनाची परवानगी रद्द झाल्याची माहिती देऊनही संबंधितांनी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक रस्त्यावर जमाव जमवून आंदोलन केले. याप्रकरणी एमपीएससीच्या विद्यार्थी प्रतिनिधींसह १५ जणांविरोधात विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. आंदोलनामुळे परिसरात मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन सार्वजनिक शांतता व सुव्यवस्थेला बाधा निर्माण झाल्याचे पोलिसांनी नमूद केले आहे.
प्रमोद पाटील, अक्षय कांबळे, अनिकेत देशमाने, प्रवीण महादेव पाटील, ऋषिकेश गांगुर्डे, प्रियांका चौधरी, नितीन गिते, सोमनाथ चव्हाण, ओंकार पाटील, गजानन शेळके, अजित काकडे, सिद्धार्थ पंचांगे, संकेत कणसे, सिद्धार्थ जांभूळकर आणि साहेबराव क्षीरसागर यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस हवालदार समीर जयराम पवार यांनी फिर्याद दिली आहे. १ ऑक्टोबरला सायंकाळी चारच्या सुमारास ही घटना घडली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विद्यार्थी प्रतिनिधी आणि इतर विद्यार्थ्यांनी २५ सप्टेंबरला विविध ठिकाणी आंदोलन करण्यासाठी पोलिसांकडे परवानगी मागितली होती. त्यानुसार २ ऑक्टोबरला त्यांना अलका टॉकीज चौक, अहिल्या अभ्यासिका आणि एस. एम. जोशी पुलाजवळ आंदोलन करण्याची परवानगी देण्यात आली होती. मात्र, त्यानंतर ३० सप्टेंबरला मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस आणि विद्यार्थी प्रतिनिधी यांच्यात झालेल्या चर्चेनंतर आंदोलन स्थगित करण्यात आल्याचे पत्र पोलिसांना देण्यात आले. त्यामुळे आंदोलनासाठी दिलेली परवानगी रद्द केल्याची माहिती संबंधितांना देण्यात आली होती.
तरीही १ ऑक्टोबरला दुपारी चारच्या सुमारास काही विद्यार्थी प्रतिनिधी व त्यांच्या सहकार्यांनी नवी पेठेतील इंदुलाल कॉम्प्लेक्ससमोरील सार्वजनिक रस्त्यावर मोठ्या संख्येने विद्यार्थ्यांना एकत्र केले. तेथे अनधिकृतपणे आंदोलन करून रस्त्यावर वाहने अडवला. त्यामुळे परिसरात वाहतूक कोंडी होऊन नागरिकांना त्रास सहन करावा लागला. भारतीय न्याय संहिता २०२३ मधील विविध कलमे तसेच महाराष्ट्र पोलिस अधिनियमातील तरतुदींनुसार ही कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास विश्रामबाग पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक विकास भिंगारदिवे करत आहेत.






















