२४ तासांत तिघांचा मृत्यू
Marathinews24.com
पुणे – मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्ग, तसेच वडगाव उड्डाणपुल परिसरात २४ तासात झालेल्या तीन अपघातात तीनजणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सिंहगड रस्ता परिसरात वडगाव उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार महाविद्यालयीन तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना शनिवारी पहाटे घडली. या अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी मित्र गंभीर जखमी झाला. त्यानंतर शनिवारी दुपारी एकच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील तीव्र उतारावर भरधाव ट्रकने दोन दुचाकी, रिक्षा, मोटारी अशा चार वाहनांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार राहुल जगन्नाथ खाटपे (वय ३२, रा. सिंहगड महाविद्यालय रस्ता, वडगाव बुद्रुक) यांचा मृत्यू झाला. या अपघातात दुचाकीस्वार दयावर हुसेन सरवर (वय ४५, रा. साईबाबानगर, कोंढवा खुर्द) हे जखमी झाले. याप्रकरणी ट्रकचालक संजय श्रीमंत बिराजदार (वय ३६, रा. सक्करगाव, ता. आळंद, जि. गुलबर्गा, कर्नाटक) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पुण्यात विंग कमांडरला तब्बल 90 लाखाचा गंडा – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खाटपे सिंहगड महाविद्यालयात सुरक्षारक्षक होते. बाह्यवळण मार्गाने शनिवारी दुपारी एकच्या सुमारास कात्रजकडून नवले पुलाकडे भरधाव वेगाने ट्रक निघाला होता. भरधाव ट्रकचालकाचे नियंत्रण सुटले. सुरुवातीला ट्रकने दुचाकीस्वार सरवर यांना धडक दिली. त्यानंतर ट्रकने मोटार, रिक्षा आणि दुचाकीस्वार खाटपे यांना धडक दिली. अपघातात दुचाकीस्वार खाटपे गंभीर जखमी झाले. अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.
वडगाव उड्डाणपुलावर शुक्रवारी (२ मे) सकाळी सातच्या सुमारास ट्रकच्या धडकेत दुचाकीस्वार तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. किरण पावनोजी गावडे-पाटील (वय ३६, रा. गगनगिरी मंदिराजवळ, हिंगणे, कर्वेनगर) असे मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुचाकीस्वार किरण हे शुक्रवारी सकाळी सातच्या सुमारास उड्डाणपुलावरून निघाले होते. त्या वेळी भरधाव ट्रकने त्यांना धडक दिली. अपघातानंतर घटनास्थळी न थांबता ट्रकचालक पसार झाला. किरण खासगी कंपनीत कामाला होते. पोलीस उपनिरीक्षक अमोल मालुसरे तपास करत आहेत.
५ महिन्यात ६ जणांचा मृत्यू
बाह्यवळण मार्गावर पाच महिन्यात गंभीर अपघात झाले असून, या अपघातात ६ जणांचा मृत्यू झाला. बाह्यवळण मार्गावरील अपघाताच्या घटना रोखण्यासाठी वाहतूक पोलीस, महामार्ग प्राधिकरणाने विविध उपाययोजना केल्या आहेत. बाह्यवळण मार्गावरील दरीपूल ते नवले पूल दरम्यान तीव्र उचारावर भरधाव वाहनांचे नियंत्रण सुटून गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात. अपघाताच्या घटना रोखण्यासाठी गतीरोधक, वेग नियंत्रणासाठी ‘रमब्लिंग स्ट्रीप’, वेगमर्यादा, तसेच जागोजागी फलक लावण्यात आले आहे. अवजड वाहनचालकांकडून वेगमर्यादा धुडकावून येत असल्याने गंभीर स्वरुपाचे अपघात घडतात, अशी माहिती वाहतूक पोलिसांनी दिली.