डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजन
marathinews24.com
पुणे – Phule Ambedkar Award : महात्मा फुले आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांनी प्रेरित होऊन सामाजिक परिवर्तनासाठी योगदान देणाऱ्या मान्यवरांचा सन्मान करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठ, पिंपरी-पुणे आणि ‘लोकशाहीसाठी समंजस संवाद’, पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने ‘महात्मा फुले-डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रेरणा सन्मान सोहळा’ आयोजित करण्यात आला आहे, अशी माहिती संयोजक अरुण खोरे यांनी दिली आहे.
सर्प, पक्षी व वन्यप्राण्यांच्या संरक्षणाबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन – सविस्तर बातमी
या सोहळ्यात ज्येष्ठ लेखिका उर्मिला पवार (मुंबई), आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते दत्ताजी गायकवाड (सोलापूर), ज्येष्ठ पत्रकार व लेखक अशोक गोपाल (पुणे) आणि सामाजिक कार्यकर्ते दत्तात्रेय काळेबेरे (पुणे) यांना सन्मानित करण्यात येणार आहे. डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांच्या हस्ते, हिंदी भाषेचे ज्येष्ठ विद्वान आणि लेखक डॉ. दामोदर खडसे यांच्या अध्यक्षतेखाली येत्या सोमवारी (ता. १२) सायंकाळी ५ वाजता एस. एम. जोशी फाउंडेशनचे सभागृह, नवीपेठ, पुणे येथे हा सोहळा होणार आहे.
उर्मिला पवार यांनी मराठी साहित्यात मोलाचे योगदान दिले असून, त्यांचे ‘आयदान’ हे आत्मचरित्र विशेष गाजले आहे. आंबेडकरी आणि स्त्रीवादी चळवळीतील त्यांच्या कार्याची दखल घेतली जाते. दत्ताजी गायकवाड हे गेल्या सहा-सात दशकांपासून आंबेडकरी चळवळ आणि सामाजिक परिवर्तनाच्या विविध आघाड्यांवर कार्यरत आहेत. (Phule Ambedkar Award) ज्येष्ठ पत्रकार अशोक गोपाल यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर संशोधनपर लेखन केले आहे. त्यांच्या ‘अ पार्ट अपार्ट: लाईफ अँड थॉट ऑफ डॉ. आंबेडकर’ या ग्रंथाला राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार मिळाला आहे. दत्तात्रेय काळेबेरे हे ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते डॉ. बाबा आढाव यांचे दीर्घकाळ सहकारी असून, समतेच्या चळवळीत त्यांचे महत्त्वपूर्ण योगदान आहे.




















