९० संवेदनशील मतदान केंद्रांवर अतिरिक्त बंदोबस्त; १२ हजार पोलिसांचा फौजफाटा
marathinews24.com
पुणे – महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर गुरुवारी शहरात कडक बंदोबस्त तैनात करण्यात येणार आहे. शहर, तसेच उपनगरात १२ हजार पोलिसांचा फौजफाटा तैनात करण्यात आला असून, ९० संवेदनशील मतदान केंद्रावर पोलिसांकडून अतिरिक्त बंदोबस्त तैनात केला जाणार आहे. अनुचित घटना रोखण्यासाठी शीघ्र कृती दल (क्विक रिस्पाॅन्स टीम), तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर विशेष पथक (स्ट्रायकिंग फोर्स) गस्त घालणार आहेत.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, गुन्हे शाखेचे अतिरिक्त आयुक्त पंकज देशमुख, मनोज पाटील, राजेश बनसाेडे, संजय पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली बंदोबस्ताची आखणी केली आहे.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर साडे तीन हजार जणांविरुद्ध कारवाई – सविस्तर बातमी
पुणे शहरासह उपनगरात ३ हजार ९८३ मतदान केद्रे (बुथ) आहेत. प्रत्येक केंद्रावर एक पोलीस कर्मचारी राहणार आहेत. शहरातील ९१३ इमारतीत मतदान होणार आहे. तेथे प्रत्येकी २ पोलीस कर्मचारी तैनात केले जाणार आहेत. प्रत्येक मतदान केंद्राच्या परिसरात वरिष्ठ अधिकाऱ्यांसह पोलीस निरीक्षक गस्त घालणार आहेत. मतदान प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी स्थानिक पोलिसांचा बंदोबस्तासह गुन्हे शाखेचे पथके तैनात केली जाणार आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यासाठी ३ हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया करण्यात आल्या आहेत. शहरात १४ पोलीस उपायुक्त, ३० सहायक पोलीस आयुक्त, १६६ पोलीस निरीक्षक, ७२३ सहायक पोलिस निरीक्षक, तसेच साडेबारा हजार पोलीस कर्मचारी असा बंदोबस्त तैनात केला आहे. गृहरक्षक दलाचे ३ हजार २५० जवान, राज्य राखीव पोलीस दलाच्या चार तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
गैरप्रकारांवर पोलिसांची नजर
महापालिक निवडणूक प्रक्रियेत १८ स्थिर, १५ फिरती पथके, तसेच व्हिडीओ चित्रीकरण करणारी १५ पथके तयार करण्यात आली आहेत. पोलिसांनी आतापर्यंत ६७ लाखांची रोकड जप्त केली आहे. तीन हजार ४३९ प्रतिबंधात्मक कारवाया केल्या आहेत. दारूबंदी कायद्यान्वये १७९ गुन्हे दाखल करण्यात आले असून, १ कोटी २३ लाख ९० हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. अमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कारवाया करण्यात आल्या आहेत. मेफेड्रोन, गांजा, चरस, नशेच्या गोळ्या असे २६ लाख ८४ हजार रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले आहेत. मतदारांना चांदीच्या वस्तू, पैशांचे वाटप प्रकरणी पोलिसांनी १७ गुन्हे दाखल केले आहेत. पोलिसांनी दोन लाख ६ हजार ३५० रुपये जप्त केले आहेत. निवडणूक प्रक्रिया झाल्यानंतर गंभीर स्वरुपाचा गुन्हा घडला नाही, अशी माहिती पोलिसांना दिली.
निवडणूक काळात १५ पिस्तुले जप्त
महापालिका निवडणुका शांततेर पार पाडण्यसाठी पोलिसांनी सराइतांविरुद्ध कडक कारवाई केली आहे. बेकायदा पिस्तूल बाळगणाऱ्या सराइतांविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांना अटक केली. त्यांच्याकडून १५ पिस्तुले, १५ काडतुसे, तसेच २९ तीक्ष्ण शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी शहरातील सराइतांना ३१३ अजामीनपात्र वाॅरंट बजावून कारवाई केली.
महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कडक बंदोबस्त तैनात केला आहे. मतदान सुरू असताना शहरातील सर्व घडमोडींचा आढावा वरिष्ठ पोलीस अधिकारी घेत आहेत. अनुचित घटना किंवा प्रकार घडल्यास त्वरीत तेथे पोलीस पोहोचतील, अशा पद्धतीने बंदोबस्ताची आखणी केली आहे. मतदान प्रक्रियेत अडथळा, तसेच गैरप्रकार करणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल.– अमितेश कुमार, पोलीस आयुक्त
























