विशेष सीबीआय न्यायालयाकडून ९ दिवस कोठडी
marathinews24.com
पुणे – देशभरात गाजत असलेल्या ‘नीट’ पेपरफुटी प्रकरणात लातूरमधील ‘आरसीसी क्लासेस’ शिकवणी वर्गाचे संचालक प्रा. शिवराज मोटेगावकर याला केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) सोमवारी अटक केली. प्रा. मोटेगावकरला ९ दिवस ‘सीबीआय’ कोठडीत ठेवण्याचे आदेश विशेष न्यायालयाने दिले. ‘पेपरफुटी प्रकरणात त्याची सीबीआयने रविवारी दिवसभर चौकशी केली होती. तसेच यापुर्वी अटक केलेला मुख्य सूत्रधार आरोपी पी. व्ही. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित होता.
पुण्यात धावत्या कारमध्ये वकिल महिलेवर अत्याचार – सविस्तर बातमी
‘नीट’ पेपरफुटी प्रकरणाच्या अनुषंगाने ‘सीबीआयच्या पथकाने लातूरमध्ये ‘आरसीसी क्लासेस’चे कार्यालय आणि मोटेगावकर यांच्या निवासस्थानी छापे टाकले. तेथून महत्वाची कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल जप्त केले. दरम्यान, निवासस्थानी टाकलेल्या छाप्यात रसायनशास्त्र विषयाशी संबंधित प्रश्नसंच सापडले. या प्रश्नपत्रिकेतील प्रश्न ३ मे रोजी पार पडलेल्या ‘नीट’च्या प्रश्नपत्रिकेत होते. पेपरफुटी प्रकरणात प्रा. मोटेगावकर सामील असल्याचे निष्पन्न झाल्यानंतर अटक केली, अशी माहिती ‘सीबीआय’कडून देण्यात आली. तत्पुर्वी रविवारी (दि. १७) सीबीआयच्या पथकाने प्रा. मोटेगावकरची पुण्यातील ‘सीबीआय’ कार्यालयात तब्बल ११ तास चौकशी केली होती.
प्रा. मोटेगावकरला अटक केल्यानंतर पुण्यातील विशेष न्यायालयात हजर केले. त्याचे कार्यालय आणि निवासस्थानातून जप्त केलेली कागदपत्रे, लॅपटॉप, मोबाइल, इलेक्ट्रॉनिक उपकरणाची तांत्रिक तपासणी करायची आहे. या प्रकरणाचा सखोल तपास करायचा आहे. तपासासाठी मोटेगावकरला ‘सीबीआय’ कोठडी देण्यात यावी, अशी विनंती ‘सीबीआय’च्या अधिकार्यांनी न्यायालयात केली. या प्रकरणात अटक करण्यत आलेल्या मोटेगावकरची प्रवासी कोठडी (ट्रान्झिट रिमांड) मिळवण्यात आली असून, पुढील तपासासाठी मोटेगावकर याला तपासासाठी दिल्लीतील सीबीआय कार्यालयात नेण्यात येणार आहे.
प्रा. मोटेगावकर, प्रा. कुलकर्णी हे मूळचे लातूरचे
जीवशास्त्राच्या अध्यापक मनीषा गुरुनाथ मांढरे हिला दिल्लीतील केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) अटक केली. दिल्लीतील विशेष न्यायालयाने १४ दिवस पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. मांढरे परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असून, तिची दिल्लीत चौकशी करण्यात आली. परीक्षा प्रक्रियेशी संबंधित असल्याने तिचा वनस्पतिशास्त्र, तसेच प्राणिशास्त्र विषयांच्या प्रश्नपत्रिकांशी संबंध होता. या प्रकरणात बिबवेवाडीतील ब्यूटीपार्लर चालक महिला मनीषा वाघमारे हिला अटक केली आहे. वाघमारेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी मांढरेला घरी बोलावले होते. तेथे मांढरेने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करून प्रश्न, अचूक उत्तरांची माहिती दिली. ही बाब तपासात उघडकीस आल्यानंतर मांढरेला अटक केली. मुख्य सूत्रधार लातूरमधील प्रा. पी. व्ही. कुलकर्णी यालाही अटक झाली आहे. कुलकर्णी हा परीक्षाप्रक्रियेशी संबंधित असल्याचे तपासात उघडकीस आले होते. प्रा. मोटेगावकर आणि प्रा. कुलकर्णी हे मूळचे लातूरचे आहेत.
आतापर्यंत १० जणांना अटक
‘सीबीआय’ने देशातील वेगवेगळ्या भागांत छापे टाकले. कागदपत्रे, मोबाइल , तसेच अन्य इलेक्ट्रॉनिक उपकरणे जप्त करण्यात आली होती. जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे, अहिल्यानगर, लातूर परिसरातून आतापर्यंत १० आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांची चौकशी सुरू असल्याची माहिती ‘सीबीआय’ने दिली आहे.
खासगी क्लासमधून कमवली कोट्यावधींची मालमत्ता
मोटेगावरने १९९९ साली खासगी क्लासद्वारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यास सुरूवात केली होती. लातूरमध्ये भाडोत्री खोलीत त्याने श्रीगणेशा केला. त्यानंतर हळूहळू त्याने विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत क्लासचे महत्व अधोरेखित केले होते. त्याच्या क्लासमध्ये तब्बल ४० हजारांहून अधिक विद्यार्थी शिक्षणाचे धडे घेत आहेत. दरम्यान, खासगी क्लासच्या जीवावर मोटेगावकरने अवघ्या २७ वर्षांत कोट्यावधींचे साम्राज्य उभे केले आहे. दरम्यान, नीट पेपरफुटी प्रकरणात त्याला अटक केल्यानंतर पालकांसह विद्यार्थ्यांमध्ये धास्ती निर्माण झाली आहे.
























