कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, लोणीकंद परिसरात अपघात
marathinews24.com
पुणे – शहरात वेगवेगळ्या अपघातात दोघांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. कात्रज बाह्यवळण मार्ग, मांजरी, तसेच पुणे-अहिल्यानगर रस्त्यावरील लोणीकंद परिसरात अपघाताच्या घटना घडल्या. कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर रस्त्यात थांबलेल्या ट्रकवर ट्रक आदळून अपघात झाल्याची घटना बुधवारी (१५ जुलै) सकाळी घडली. अपघातात ट्रकमधील मदतनीसाचा (क्लिनर) मृत्यू झाला. जमसुद्दीन मोहम्मद गौसदेसाई (वय ४२) असे मृत्युमुखी पडलेल्या मदतनीसाचे नाव आहे. अपघातास जबाबदार ठरल्या प्रकरणी ट्रक चालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस शिपाई बालाजी पांचाळ यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पुण्यात अल्पवयीनासह मित्रावर शस्त्राने वार – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कात्रज-देहूरोड बाह्यवळण मार्गावर बुधवारी सकाळी सहाच्या सुमारास ट्रक थांबला होता. त्या वेळी भरधाव निघालेल्या ट्रकचालकाने रस्त्याच्या कडेला थांबलेल्या ट्रकला पाठीमागून धडक दिली. अपघातात ट्रकमधील मदतनीस जमसुद्दीन याचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत. पुणे -अहिल्यानगर रस्त्यावर लोणीकंद परिसरात भरधाव टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू झाल्याची घटना १४ जुलै रोजी रात्री घडली. हरिभाऊ कांदे असे मृत्युमुखी पडलेल्याचे नाव आहे. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी रामराव कांदे हे गंभीर जखमी झाले. याबाबत कांदे यांचे नातेवाईक परमेश्वर मच्छिंद्र चाटे (वय २६, रा. खांदवेनगर, वाघोली) यांनी लोणीकंद पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चाटे यांचे मावसभाऊ हरिभाऊ कांदे, रामराव कांदे हे १४ जुलै रोजी रात्री अकराच्या सुमारास लोणीकंदमधील फुलगाव रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव टेम्पोने दुचाकीला धडक दिली. अपघातात हरिभाऊ कांदे यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक कदम तपास करत आहेत.
भरधाव वाहनाच्या धडकेत पादचारी ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना मांजरी परिसरात घडली. अपघातात ज्येष्ठ नागरिकाबरोबर असलेले दोन नातू हे गंभीर जखमी झाले. हडपसरमधील मांजरी स्टड फार्म रस्त्यावर बुधवारी सकाळी ही घटना घडली. या प्रकरणी मोटार चालकाविरुद्ध गु्न्हा दाखल करण्यात आला आहे. अरुण कोेडिंबा निसाळकर (वय ३४, रा. रुखमाई सृष्टी पार्क, मांजरी फार्म) यांनी याबाबत मांजरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिील आहे. अपघातात कोडिंबा निसाळकर (वय ६१) यांचा मृत्यू झाला. कोडिंबा यांचे नातू शिवम (वय ६), आरव (वय ६) हे गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोेडिंबा निसाळकर, त्यांचे नातू शिवम, आरव हे बुधवारी सकाळी सातच्या सुमारास मांजरी स्टड फार्म रस्त्याने निघाले होते. त्या वेळी भरधाव चारचाकी वाहने पादचारी कोडिंबा, त्यांचे नातू, शिवम आणि आरव यांना धडक दिली. अपघातात कोंडिबा आणि त्यांचे नातू हे गंभीर जखमी झाले. अपघातानंतर वाहन चालक पसार झाला. गंभीर जखमी झालेल्या कोडिंबा यांचा उपचारांदरम्यान मृत्यू झाला. पोलीस उपनिरीक्षक प्रियंका चव्हाण तपास करत आहेत.
























