३३,९७६ हेक्टर क्षेत्रातील पंचनामे पूर्ण
marathinews24.com
पुणे – Pune Crop Panchnama : खरीप हंगाम २०२६ मधील पर्जन्यमानातील तूट व अन्य नैसर्गिक घटकांमुळे बाधित झालेल्या पुणे जिल्ह्यातील आठ तालुक्यांमध्ये दुष्काळ जाहीर करून विविध उपाययोजना व सवलती लागू करण्यात आल्या आहेत. शासनाच्या निर्देशानुसार या तालुक्यांमध्ये पंचनामे करण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील भोर, वेल्हा, खेड, शिरूर, बारामती, इंदापूर, दौंड आणि पुरंदर या आठ तालुक्यांचा यामध्ये समावेश आहे. Pune Crop Panchnama या तालुक्यांमध्ये एकूण १,१०२ गावांतील ८ लाख २८ हजार ४२८ खातेदार पंचनाम्याच्या कार्यवाहीत समाविष्ट झाले आहेत. एकूण ३ लाख ३२ हजार ५८ हेक्टर क्षेत्रावरील विविध पिकांच्या नुकसानीची नोंद करण्यात आली आहे.
पंचनाम्यानुसार ३३,९७६.५६ हेक्टर क्षेत्रावरील ६४ हजार ८७५ खातेदारांचे पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत. तालुकानिहाय आकडेवारीनुसार भोर १२८९.७०, वेल्हा ८०८, शिरूर ७७५.०९, बारामती १९४८, पुरंदर १०,७२९, इंदापूर ६,६८७.६१, खेड ६,२८० आणि दौंडमध्ये ५,४५९.१६ हेक्टर क्षेत्राचे पंचनामे पूर्ण झाले आहेत.
दुष्काळ लागू झालेल्या तालुक्यांतील ज्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे अद्यापपर्यंत झालेले नाहीत, त्यांनी संबंधित ग्राम महसूल अधिकारी, ग्रामविकास अधिकारी किंवा सहायक कृषी अधिकारी यांच्याशी संपर्क साधावा. पिकांचे पंचनामे पूर्ण करून घ्यावेत, जेणेकरून कोणताही शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहणार नाही, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी वैभव तांबे यांनी केले आहे.






















