Breking News
फ्लाईंग जिप्सी कॅफेला दणका, तोपर्यंत बंद ठेवणारपुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना केंद्रीय गृह मंत्रालयाचे ‘अतिउत्कृष्ट सेवा पदक’हाफकिन संस्थेला गतवैभव मिळवून देण्यासाठी शासन कटिबद्ध – राज्यमंत्री योगेश कदममहा वॉकेथॉन २०२६-वॉक फॉर वॉटर मध्ये नागरिकांनी सहभागी व्हावेसिंहगड रस्ता भागात घरातून बेकायदा मद्य विक्री; आरोपीला अटकडाॅक्टरांकडे १० लाखांची खंडणी मागणाऱ्या तोतया पत्रकारांविरुद्ध गुन्हाजलसंधारण दिनानिमित्त पुणे जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजनशीघ्र हस्तक्षेपण व शाळापूर्व तयारीसाठी क्रॉस डिसॅबिलिटी अभ्यासक्रम आराखड्याचे लोकार्पणपुणे जिल्ह्यातील जलसंधारण चळवळ : एक दृष्टीक्षेप…!!टेम्पोच्या धडकेत तरुणाचा मृत्यू

अजातशत्रू डॉ. कदम यांचे कर्तृत्व हिऱ्यासमान झळाळते-डॉ. रघुनाथ माशेलकर

अजातशत्रू डॉ. कदम यांचे कर्तृत्व हिऱ्यासमान झळाळते-डॉ. रघुनाथ माशेलकर

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणीतर्फे डॉ. शिवाजीराव कदम यांचा अमृतमहोत्सवी सन्मान

marathinews24.com

पुणे – डॉ. शिवाजीराव कदम यांचे कर्तृत्व हिऱ्यासमान झळाळते असून त्यांचा सन्मान हा एका सुंदर, समृद्‌ध, प्रेरणादायी, अर्थपूर्ण जीवनप्रवासाचा गौरव आहे. त्यांच्या आयुष्याचे मोल, उदारता, शिक्षण क्षेत्रातील योगदान मोजणे म्हणजे आकाशाची उंची मोजण्याप्रमाणे आहे. शिक्षण हे समाजपरिवर्तनाचे साधन आहे या उदात्त हेतूने डॉ. पतंगराव कदम यांच्या मार्गदर्शनाखाली गेली ५० वर्षे ते सातत्याने कार्यरत आहेत. ते कुशल संघटक, प्रगत नेतृत्व, कृतिशील विचारवंत, विनम्र आणि संयत असून अजातशत्रू व्यक्तीमत्त्व हे त्यांचे वैशिष्ट्य आहे, असे गौरवोद्‌गार पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी काढले.

अमली पदार्थविरोधी जनजागृतीसाठी राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणे आणि मनीषा प्रकाशन, मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने भारती विद्यापीठाचे कुलपती डॉ. शिवाजीराव कदम यांचा अमृत महोत्सवी सन्मान व मानपत्र प्रदान समारंभ सोमवारी (दि. १५) आयोजित करण्यात आला होता. डॉ. कदम यांचा सन्मान पद्मविभूषण डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते करण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राज्य सहकारी बँकेचे मुख्य प्रशासक विद्याधर अनास्कर होते. एस. एम. जोशी सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख पाहुणे म्हणून सातारच्या रयत शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष चंद्रकांत दळवी, ज्येष्ठ उद्योजक सतीश मगर, ९९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष विश्वास पाटील, माजी मंत्री, आमदार विश्वजीत कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या जीवनावरील ‘ज्ञानतपस्वी’ या मधुकर भावे यांनी संपादित केलेल्या पुस्तकाचे लोकार्पण मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. महाराष्ट्र साहित्य कला प्रसारिणी सभा, पुणेचे अध्यक्ष सचिन ईटकर, सचिव रवींद्र डोमाळे, उपाध्यक्ष रजनी कानडे, लता राजगुरू मंचावर होते. फुले पगडी, शाल, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ असे पुरस्काराचे स्वरूप होते.

डॉ. रघुनाथ माशेलकर म्हणाले, व्यक्तीकडे वयाच्या पंचवीशीत ऊर्जा असते, पन्नाशीत उपलब्धी असते तर पंचाहत्तरीत अनुभव आणि शहाणपणाचे अमूल्य भांडार असते. ज्ञान आपल्याला काय करायचे ते सांगते पण शहाणपण ते कधी, कसे आणि का करायचे हे शिकवते. डॉ. शिवाजीराव कदम यांच्या जीवनाचा ७५ वर्षांचा प्रवास ही खऱ्याखुऱ्या शहाणपणाची संपत्ती आहे.

सत्काराला उत्तर देताना डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, आजच्या सत्काराने मी खरोखरच भारावून गेलो आहे. जीवनातील या प्रवासात पूजनीय आई-वडिल व बंधू डॉ. पतंगराव यांचे भरभरून आशीर्वाद लाभले आहेत. शिक्षण आणि कार्यकर्तृत्वामुळे माणूस जीवनात मोठा होतो हे मूल्य रयत शिक्षण संस्थेने माझ्यात रुजविले आहे. हा दिवस माझ्या पाच दशकांच्या ज्ञानयज्ञाची तपश्चर्या आहे. गतिमान शिक्षणातून समाजपरिवर्तन या हेतूने भारती विद्यापीठाच्या माध्यमातून मी सातत्याने कार्यरत आहे.

अध्यक्षपदावरुन बोलताना विद्याधर अनास्कर म्हणाले, डॉ. शिवाजीराव कदम यांचा सन्मान हा गुरुतुल्य व्यक्तीचा ऋषितुल्य व्यक्तीच्या हस्ते होणारा गौरव आहे. संस्कारित शिक्षक उत्तम संस्कारी शिष्य घडवितात. अशा संस्कारांमधून डॉ. शिवाजीराव कदम यांची जडणघडण झाली आहे. त्यांचे अनुभव, विचार आणि कार्याचा वारसा पुढील पिढीला मार्गदर्शक ठरेल.

चंद्रकांत दळवी म्हणाले, डॉ. शिवाजीराव कदम यांचा जीवनपट सर्वांसाठी मार्गदर्शक आहे. त्यांना घडविण्यात डॉ. पतंगराव कदम यांचा मोठा वाटा आहे. डॉ. शिवाजीराव कदम यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान मोलाचे आहे. ते ध्येयनिष्ठ शिक्षणतज्ज्ञ, कुशल प्रशासक, उत्तम संशोधक आहेत. तर विश्वास पाटील म्हणाले, ‘काका अजून तुम्ही वृद्ध का होत नाहीत’ अशी विचारणा होणाऱ्या काळात कदम कुटुंबिय आनंदाने, गुण्यागोविंदाने एकत्र नांदत आहेत या मागे त्यांच्या घरी असलेली संस्कारित पार्श्वभूमी आहे. डॉ. पतंगराव कदम हे स्वप्नांचे ध्येय, आकांक्षा बाळगत विहार करणारे व्यक्तीमत्त्व होते तर डॉ. शिवाजीराव कदम यांनी जमिनीवर स्थिर राहून गडकिल्ले सांभाळले आहेत. बहुजन समाजातील विद्यार्थ्यांना शिक्षित करण्याचे कार्य डॉ. पतंगराव कदम आणि डॉ. शिवाजीराव कदम यांनी केले आहे, असे सतीश मगर म्हणाले.डॉ. विश्वजीत कदम म्हणाले, डॉ. पतंगराव कदम यांनी राजकारणात प्रवेश करताना डॉ. शिवाजीराव कदम यांना शिक्षण क्षेत्राच्या कामकाजात आणले आणि त्यांनी आपल्या भावाचे स्वप्न साकारण्यासाठी आपले सर्व आयुष्य अर्पण केले. महाराष्ट्राच्या राजकीय इतिहासात चुलते-पुतणे संबंध या विषयी कलुषित मते असताना विश्वजीत कदम मात्र सहा चुलत्यांना आनंदाने सांभाळून घेत आहे. स्वागतपर प्रास्ताविकात सचिन ईटकर यांनी कार्यक्रमाच्या आयोजनामागील भूमिका विशद करून डॉ. शिवाजीराव कदम यांच्या शिक्षण क्षेत्रातील ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेतला.

मधुकर भावे म्हणाले, डॉ. शिवाजीराव कदम यांनी शिक्षण पद्धतीवर केलेल्या विश्लेषणातून प्रभावीत होऊन त्यांच्याशी मैत्र वाढविले. त्यांच्या विचारांमुळे मला जीवनाकडे पाहण्याची नवीन दृष्टी मिळाली. डॉ. पतंगराव कदम यांचे स्वप्न साकारण्यासाठी डॉ. शिवाजीराव कदम त्यांच्यामागे ठामपणे उभे राहिले. या सत्कार सोहळ्यातून सुशिक्षित आणि जबाबदार महाराष्ट्र घडावा अशी अपेक्षा आहे.
डॉ. शिवाजीराव कदम यांचे शिक्षक जी. व्ही. कुलकर्णी यांनी मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व मानपत्राचे वाचन स्नेहल दामले यांनी केले. तर आभार विराज तावरे यांनी मानले. रजनी कानडे, लता राजगुरू यांचा या वेळी विशेष सन्मान करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×