उरळी कांचनमधील अपहरणाचा उलगडा; चौघांना बेड्या
marathinews24.com
पुणे – डॉक्टरचे अपहरण करून खंडणी उकळणार्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह उरळी कांचन पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. डॉक्टरांचा वाहन चालकच अपहरणकर्त्यांमध्ये सहभागी असल्याचे उघडकीस आले आहे. पोलिसांनी ४८ तासांत गुन्ह्याची उकल करीत टोळक्याकडून १५ लाख ८० हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. चारही आरोपींना न्यायालयाने २० जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
खरेदीच्या बहाण्याने आला अन दागिने चोरून गेला – सविस्तर बातमी
राजेंद्र छगन राजगुरु (वय ३२ रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) संतोष सोमनाथ बनकर (वय ३६, रा. अनंतपुर, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर ) दत्ता ऊर्फ गोटू बाळू आहेर (वय ३४ रा. अनंतपुर, सी.आर.गेट, पैठण जि. छत्रपती संभाजीनगर) सुनील ऊर्फ सोनू मुरलीधर मगर (वय ३० रा. गणेश नगर, गारखेडा परिसर, जि. छत्रपती संभाजीनगर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. डॉक्टर विठ्ठल किसन चौधरी (५८ रा. कुंजीर वाडी, ता. हवेली) यांनी फिर्याद दाखल केली आहे.
डॉक्टर विठ्ठल चौधरी हे १० जानेवारीला मोटारीतून रात्री सव्वा दहाच्या सुमारास उरळी कांचन परिसरातील कुंजीरवाडीच्या दिशेने प्रवास करीत होते. त्यावेळी त्यांच्यासोबत ड्रायव्हर राजेंद्र राजगुरु हा होता. इनामदार वस्ती परिसरात दुसर्या मोटार चालकाने त्यांना गाडी आडवी उभी केली. वाहनातील चार आरोपी हे डॉक्टरांच्या वाहनात बसले. त्यांना चाकूचा धाक दाखवून जीव मारण्याची धमकी देत त्यांचे अपहरण केले. टोळक्यांनी धाकाने वाहन शिंदवणे बाजूकडे नेले. डॉक्टरांना हाताने लाथाबुक्क्यांनी मारहाण करून आरोपींनी ४ लाख रुपयांची खंडणी घेउन त्यांना चौफुला परिसरात सोडले. आणखी पैसे न दिल्यास ठार मारण्याची धमकी दिली. त्यामुळे १२ जानेवारीला डॉक्टरांनी भीतीपोटी १५ लाख रूपये दिले.
डॉक्टरच्या वाहनाचा ड्रायव्हरचा गुन्हयात सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. पथकाने राजेंद्रला ताब्यात घेत चौकशी केली. त्याने साथीदारांच्या मदतीने डॉक्टरांचे अपहरण खंडणी घेतल्याची कबुली दिली. तांत्रिक विश्लेषणाद्वारे तिन्हीही आरोपींना छत्रपती संभाजीनगरातून ताब्यात घेत ८ लाखांची रोकड, साडेसात लाखांची मोटार असा १५ लाख ८० हजारांचा ऐवज जप्त केला.
ही कामगिरी पोलीस अधीक्षक संदीप सिंह गिल्ल, अपर अधीक्षक गणेश बिरादार, उपविभागीय अधिकारी बापूराव दडस, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर,पोलीस निरीक्षक सचिन वांगडे, एपीआय ज्ञानेश्वर बाजीगरे, उपनिरीक्षक अमित सिदपाटील, सचिन घाडगे, अजित भुजबळ, आसिफ शेख, राजू मोमीण, योगेश नागरगोजे, धिरज जाधव, अजित काळे, प्रविण चौधर, निलेश जाधव, प्रशांत पवार, विशाल रासकर, सुमित वाघ, दिपक यादव, अमोल राऊत यांनी केली.
























