तरूणाला ११ लाख ८० हजारांचा गंडा
marathinews24.com
पुणे – क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास तब्बल ३०० टक्के नफा देण्याचे आमिष दाखवून सायबर चोरट्यांनी तरूणाला तब्बल ११ लाख ८० हजारांचा ऑनलाईन गंडा घातला आहे. ही घटना २ ते ५ मार्च २०२४ कालावधीत घडली होती. याप्रकरणी तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात तक्रार अर्ज दाखल केला होता. त्यानुसार आता याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अज्ञात सायबर चोरट्यांविरूद्ध कारवाईची मागणी केली जात आहे.
मौजमजेसाठी दुचाकी चोरणारे गजाआड – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ३६ तरूण वर्षीय स्वारगेट परिसरात राहायला असून, २ मार्च २०२४ रोजी सायबर चोरट्यांनी त्यांच्याशी संपर्क साधला होता. त्यानंतर सायबर चोरट्यांनी तक्रारदाराचा विश्वास संपादित केला. क्रिप्टो करन्सीमध्ये गुंतवणूक केल्यास तब्बल ३०० टक्के नफा देण्याचे आमिष दाखविले. अवघ्या तीन दिवसांत तक्रारदाराने तब्बल ११ लाख ८० हजार रूपये संबंधिताच्या बँकखात्यात वर्ग केले होते. मात्र, त्यांना नफ्याचा परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तक्रारदाराने सायबर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार अर्ज दाखल केला होता. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड तपास करीत आहेत.
पीएमपीएल बसप्रवासात महिलेचे मंगळसूत्र चोरीला
पीएमपीएल बसप्रवासात गर्दीचा फायदा घेउन चोरट्यांनी महिलेच्या पिशवीतून ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. ही घटना २४ जुलैला संध्याकाळी सव्वा पाच वाजण्याच्या सुमारास हडपसर बसस्थानक ते शिवाजीनगर प्रवासादरम्यान घडली आहे. याप्रकरणी सुप्रिया ईर्ला (वय २३ रा. मुंढवा) यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार सुप्रिया ईर्ला मुंढव्यात राहायला असून, २४ जुलैला संध्याकाळी सव्वा पाचच्या सुमारास हडपसर ते शिवाजीनगर असा पीएमपीएल बसप्रवास करीत होत्या. त्यावेळी बसप्रवासात चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेउन महिलेच्या पिशवीतून ९० हजारांचे सोन्याचे मंगळसूत्र चोरून नेले. बसमधून उतरल्यानंतर सुप्रियाला दागिन्याची चोरी झाल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस अमलदार फड तपास करीत आहेत.
वारजे माळवाडीत घरफोडी, पावणे आठ लाखांचा ऐवज चोरीला
बंद फ्लॅटचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल असा ७ लाख ७५ हजारांचा ऐवज चोरून नेला. ही घटना २७ जुलैला दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास वारजे माळवाडीतील पृथक कॉर्नर इमारतीतील ४०१ फ्लॅटमध्ये घडली आहे. याप्रकरणी प्रसन्न जंगम (वय ३४ रा. वारजे माळवाडी ) यांनी वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार जंगम हे २७ जुलैला फ्लॅट बंद करून नातेवाईकांना भेटण्यासाठी गेले होते. त्यावेळी चोरट्यांनी त्यांच्या फ्लॅटचे कुलूप तोडून आतप्रवेश केला. कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने, लॅपटॉप, मोबाइल असा पावणेआठ लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. जंगम हे घरी आल्यानंतर त्यांना चोरी झाल्याचे दिसून आले. त्यानंतर त्यांनी तातडीने वारजे माळवाडी पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. पोलीस उपनिरीक्षक नरळे तपास करीत आहेत.