फुले-आंबेडकरांचा प्रगतशील विचार मनामनात रुजावा – सतीश राऊत यांचे मत

पद्मा फाउंडेशनतर्फे आंबेडकर जयंतीनिमित्त सन्मान सोहळ्याचे आयोजन

marathinews24.com

पुणे – “चांगल्या शिक्षणातून व संस्कारातून माणूस घडतो. जाती, धर्म व लिंगभेदाच्या भिंती बाजूला सारून सर्वांना शिक्षणाच्या समान संधी मिळाव्यात, यासाठी महात्मा ज्योतिराव फुले व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी कार्य उभारले. त्यांनी दिलेला प्रगतिशील विचार प्रत्येकाच्या मनात रुजवण्याची, त्यांच्या विचारांचा अंगीकारून त्या मार्गाने चालण्याची गरज आहे,” असे मत अपर जिल्हाधिकारी सतीश राऊत यांनी व्यक्त केले. गावकुसाबाहेर साजरी होणारी आंबेडकर जयंती सर्वसमावेशक व मुख्य प्रवाहातही साजरी होतेय, याचे समाधान वाटत असल्याचे त्यांनी नमूद केले.

बोपोडीत आंबेडकर जयंतीनिमित्त ४० फूट महाबोधी विहाराची भव्य प्रतिकृती – सविस्तर बातमी

पद्मा फाउंडेशनच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त आयोजित ‘गौरव कार्याचा… उगवत्या ताऱ्यांचा’ या सन्मान सोहळ्यात सतीश राऊत बोलत होते. समाजातील विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना यावेळी गौरविण्यात आले. शिक्षण, सामाजिक कार्य, पर्यावरण संवर्धन आणि आरोग्य या क्षेत्रांत योगदान देणाऱ्यांचा सत्कार करण्यात आला. प्रसंगी डॉ. दत्ता कोहिनकर यांचे ‘मनाची मशागत’ या विषयावर व्याख्यान झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन, तसेच ज्येष्ठ गायिका आशा भोसले यांना श्रद्धांजली वाहून कार्यक्रमाची सुरुवात झाली.

सिंहगड रस्त्यावरील मॉंटेरोसा सोसायटीमध्ये आयोजित कार्यक्रमावेळी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, पोलीस उपायुक्त संभाजी कदम, आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष सचिन ईटकर, केंद्रीय राखीव सुरक्षा दलाचे कमांडर कवींद्र कुमार, निरीक्षक रामदास यशवंते, उद्योजक तुषार गोसावी, सामाजिक कार्यकर्ते डॉ. मिलिंद भोई, पुणे महानगरपालिकेतील नाव समितीच्या अध्यक्षा पल्लवी जावळे, माजी उपमहापौर सरस्वती शेंडगे, नगरसेविका ज्योती गोसावी, नगरसेवक सुरज लोखंडे, पद्मा फाउंडेशनचे संस्थापक शशिकांत कांबळे, पुष्पा कांबळे आदी उपस्थित होते.

सतीश राऊत म्हणाले, “महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांनी दिलेल्या समतेच्या, शिक्षणाच्या आणि सामाजिक न्यायाच्या विचारांची आज अधिक गरज आहे. हा प्रगतशील विचार प्रत्येकाच्या मनामनात रुजवला पाहिजे. बालपणी जातीभेदाच्या विरोधात बंड करण्याची प्रेरणा मला याच विचारांनी दिली. आजही समाजात असलेली असमानता आणि अन्याय दूर करण्यासाठी हा विचार पुढे नेला पाहिजे. रंगावरून कोणत्याही माणसाची ओळख निर्माण होऊ नये.”
राजेश पांडे म्हणाले, ” डॉ. आंबेडकर यांचे संपूर्ण जीवन अवघ्या विश्वाला प्रेरणादायी आहे. त्यांच्या कार्याचा, विचारांचा वारसा आपण नवीन पिढीला द्यायला हवा. अशा कार्यक्रमांतून समाजातील संवाद आणि विचारांची देवाणघेवाण वाढते. तरुणांनी वाचनाला प्राधान्य द्यावे. शिक्षण, चांगले वाचन यातूनच प्रगल्भ समाजाची निर्मिती होईल.”

संभाजी कदम यांनी यशाच्या शिखरावर पोहोचले, तरीही माणसाने मुळांना विसरू नये, असे सांगत संविधान हा देशाचा आत्मा असून, त्याच्या बळावरच भारत प्रगती करत आहे, असे त्यांनी नमूद केले. डॉ. भोई यांनी महामानवांच्या जयंती डीजेमुक्त होण्यासाठी आपण सर्वानी प्रयत्न करायला हवेत, असे सांगितले. सचिन ईटकर यांनी डॉ. आंबेडकर यांच्या विविध पैलूंवर भाष्य करीत मनोगत व्यक्त केले. कवींद्र कुमार यांनी आम्ही संविधानाचे रक्षक असून, देशसेवेचे काम करत आहोत, याचा अभिमान वाटतो, असे नमूद केले.

फाउंडेशनचे माध्यम सल्लागार जीवराज चोले यांनी प्रास्ताविक केले. आशिष जराड यांनी सूत्रसंचालन केले. शशिकांत कांबळे यांनी आभार मानले.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×