चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathknews24.com
पुणे – पूर्ववैमनस्यातून तरुणावर तीक्ष्ण शस्त्राने वार करुन खून करण्यात आल्याची घटना नगर रस्त्यावरील वाघोली परिसरात घडली. याप्रकरणी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. विकी विजय दिवटे (वय २१, रा. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर वसाहत, चंदननगर ) असे खून झालेल्याचे नाव आहे. याबाबत विकी दिवटे याची आई नंदा (वय ४०) यांनी चंदननगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.
पुण्यात आरएसएसच्या ‘मोतीबाग’ परिसरात वाहने लावण्यास मनाई – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विकी दिवटे आणि त्याची आई विजया हे चंदननगर भागात राहायला आहेत. आरोपींशी विकीचा वाद झाला होता. २४ जानेवारी रोजी रात्री साडेअकराच्या सुमारास नगर रस्त्यावरील वाघोली भागात एका सोसायटीच्या परिसरात आरोपींनी विकीवर तीक्ष्ण शस्त्राने वार केले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त रजनीकांत चिरमुला, उपायुक्त विवेक मासाळ, चंदननगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सर्जेराव कुंभार यांनी घटनास्थळी भेट दिली. गंभीर जखमी झालेल्या विकीला रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारांपूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. पोलीस उपनिरीक्षक हवाले तपास करत आहेत.


























