पुणे : मराठी न्यूज 24. कॉम – पान टपरी चालकाला धमकावुन चौघा जणांनी हाताने मारहाण करुन खिशातील पैसे जबरदस्तीने चोरले. तसेच पान टपरी व मोटारसायकलवर दगड मारुन नुकसान केल्याचा प्रकार समोर आला आहे.
याबाबत विशाल जयपाल बनसोडे (वय २०, रा. साडेसतरा नळी, हडपसर) यांनी हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यावरुन अभिषेक ऊर्फ अभ्या पाचपवार, रोहित शिंदे, निरंजन सोनवणे आणि आतिश साठे (रा. हडपसर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार साडेसतरानळी येथील ग्रामपंचायत कॅनॉलजवळ १९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता घडला.
याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांची पान पटरी आहे़ ते पान टपरीमध्ये असताना १९ मार्च रोजी रात्री साडेदहा वाजता त्यांच्या परिसरातील अभिषेक पाचपवार, रोहित शिंदे, निरंजन सोनवणे, आतिष साठे तेथे आले. पाचपवार याने हातातील लोखंडी हत्यार दाखवून बनसोडे यांना बाहेर निघ असे बोलला. त्याला घाबरुन ते बाहेर आले. अभिषेक याने हातातील लोखंडी हत्याराने त्यांना लय माजला काय, असे बोलून हत्याराने मारले. तेव्हा ते मागे सरकून पळून जाऊ लागले. त्यांनी हत्याराचा वार चुकविला. तरी तो त्यांच्या पाठीवर लागल्याने त्यांना दुखापत झाली. त्याच्या साथीदारांनी बनसोडे यांना पकडून हाताने मारहाण केली. हत्याराचा धाक दाखवून खिशातील २६०० रुपये जबरदस्तीने काढून घेतले. टपरीवर दगड व हातातील लोखंडी हत्याराने मारले. शेजारी पार्क केलेल्या मोटारसायकलवर दगड व हत्याराने मारुन नुकसान केले. सहायक पोलीस निरीक्षक दिपिका जौंजाळ तपास करीत आहेत.