शिवचरित्राचा दीपस्तंभ हरपला; गजानन मेहेंदळेंच्या स्मृतींना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हेंची विनम्र श्रद्धांजली
marathinews24.com
छत्रपती संभाजीनगर – ज्येष्ठ शिवचरित्रकार, संशोधक व लेखक गजानन भास्कर मेहेंदळे यांच्या निधनाने महाराष्ट्राने एक असामान्य अभ्यासक गमावला आहे, अशा शब्दांत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी दुःख व्यक्त केले. “शिवचरित्राचा अखंड अभ्यास, युद्धशास्त्राची सखोल जाण आणि इतिहास संशोधनातील अविरत परिश्रम या गुणांनी मेहेंदळे समृद्ध होते. बांगलादेश मुक्ति संग्रामाच्या युद्धपत्रकारितेत त्यांनी दाखवलेले धैर्य आणि पुढील काळात शिवचरित्र संशोधनासाठी वाहिलेले त्यांचे संपूर्ण आयुष्य हे महाराष्ट्रासाठी अभिमानास्पद आहे.”
बँकेचे अॅप बंद पडल्याची बतावणी, जेष्ठाला २ लाखांना घातला गंडा – सविस्तर बातमी
त्यांच्या लेखणीमधून साकारलेले ‘श्री राजा शिवछत्रपती’, ‘Shivaji: His Life and Times’, ‘शिवछत्रपतींचे आरमार’ हे ग्रंथ शिवकालीन इतिहासाला नवे परिमाण देणारे ठरले. “शिवकालीन आरमार, राजकीय धोरणे, युद्धतंत्र यांचा त्यांनी केलेला अभ्यास भविष्यातील संशोधकांसाठी दीपस्तंभ ठरेल. त्यांच्या लिखाणातून भावी पिढ्यांना दिशा मिळत राहील,” असे डॉ. गोऱ्हे यांनी नमूद केले.
डॉ. गोऱ्हे पुढे म्हणाल्या, “इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात मेहेंदळे यांची उणीव कधीही भरून न निघणारी आहे. त्यांच्या जाण्याने शिवचरित्र अभ्यासाच्या वाटचालीत निर्माण झालेली पोकळी दीर्घकाळ जाणवेल. त्यांच्या आत्म्यास शांती लाभो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. त्यांच्या स्मृतींना मी विनम्र अभिवादन करते.”























