राजस्थानच्या तस्कराला बेड्या, १० लाख ६० हजारांचे एमडी जप्त
Marathinews24.com
पुणे – स्पोर्ट बाईकवरुन मेफेड्रॉन विक्रीसाठी आलेल्या एका तस्कराला पुणे गुन्हे शाखेच्या अमली पदार्थ विरोधी पथक दोनने खडकी परिसरात अटक केली आहे. त्याच्याकडून १० लाख ६० हजारांचे ५३ ग्रॅम मेफेड्रॉन, १ लाख ८० हजारांची महागडी दुचाकी असा १३ लाखांचा ऐवज जप्त केला आहे. बजरंगलाल भगवानराम खिल्लेरी (वय २१ रा. जाधववाडी, मोशी, मुळ गाव राजस्थान) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
रेल्वेत धावून आल्या देवदूत परिचारिका, तरुणीचा जीव वाचवला – सविस्तर बातमी
अमली पदार्थ विरोधी पथक दोनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक हे १६ एप्रिलला पथकासह खडकी पोलीस ठाण्याच्या हद्दीत पेट्रोलिंग करीत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार युवराज कांबळे यांना मिळालेल्या माहितीनुसार बजरंगलाल खिल्लेरी हा एमडी विक्रीसाठी आल्याची माहिती मिळाली. तो संशयास्पदरित्या मिळुन आल्याने त्याची अंगझडती घेतली. त्यावेळी त्याच्याकडे १० लाख ६० हजारांचे एमडी, १ लाख ८० हजारांची स्पोर्ट बाईक, इतर ऐवज असा १३ लाखांचा ऐवज मिळून आला. ही कामगिरी पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर आयुक्त शैलेश बलकवडे, उपायुक्त निखील पिंगळे, एसीपी राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाला पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, युवराज कांबळे, रोकडे, शेख, राक्षे, शेख, पाटील, दिनेश बास्टेवाड यांनी केली आहे.
दोन लाखांची स्पोर्ट बाईकही जप्त
अमली पदार्थाची विक्री करताना आपल्याला कोणीही ओळखू नये, तसेच पोलिसांपासून सुसाट वेगाने निघून जाण्यासाठी तस्कराने दोन लाखांची स्पोर्ट बाईक गुन्ह्यात वापरल्याचे दिसून आले आहे. त्याच्याकडील बाईक पोलिसांनी जप्त केली आहे. संबंधित दुचाकीच्या क्रमांकानुसार माहिती काढली जात असून, नेमकी गाडी कोणाची आहे याचा तपास केला जात आहे.
स्पोर्ट बाईकवर मेफेड्रॉन विक्री करण्यासाठी आलेल्या तस्कराला ताब्यात घेतले. त्याच्याकडून १० लाख ६० हजारांचे ५३ ग्रॅम एमडी जप्त केले आहे. त्याची गाडीही जप्त केली असून, अधिक तपास सुरू आहे. – सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक, अमली पदार्थ विरोधी पथक दोन