काळेवाडी फाट्यानजीक ६ महिन्यांपूर्वीच्या खुनाला फुटली वाचा
Marathinews24.com
पिंपरी चिंचवड – मित्राच्या पत्नीबाबत अश्लील बोलल्याच्या रागातून टोळक्याने तरूणाचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह पुलावरून फेकून देत अपघाताचा बनाव रचला. याप्रकरणी पोलीस तपासातही काहीच निष्पन्न झाले नव्हते. त्यामुळे खून करणारे मात्र बिनधास्त होते. मात्र, आरोपीपैकी एकाने दारू पिल्यानंतर आपण एकाचा कसा काटा काढला, याची फुशारकी मारली. त्याचा गेम केला, तसा तुलाही संपवीन, अशी धमकी त्याने पुन्हा एकाला दारू पिताना दिली होती. त्यानंतर संबंधित खबर्यााने पिंपरी-चिंचवड पोलिसांना घटनेची माहिती दिली. त्यानुसार वाकड पोलिसांनी गुन्ह्याची उकल करीत आरोपींच्या मुसक्या आवळल्या आहेत.
सावकरासोबत पत्नीचे झेंगाट – सविस्तर बातमी
पिंपरी-चिंचवड शहरातील काळेवाडी फाटा परिसरात थेरगावमधील २६ वर्षीय तरुण १५ मार्च २०१३ रोजी मित्रांसोबत रात्री दारू पिण्यासाठी बसला होता. त्यावेळी त्याने दारूच्या नशेत मित्राच्या पत्नीबाबत अश्लील भाषा वापरल्याचा संबंधितांना आला. त्यामुळे आरोपींनी तरुणाला मारहाण केल्यानंतर त्याला उपचारासाठी सांगवीतील जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात दुचाकीवरून नेण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी जखमी तरुणाला रस्त्यात शुद्ध आली. मी आता नशेत आहे, म्हणून तुम्ही मला मारहाण केली. मी शुद्धीत आल्यावर तुमचा गेम करतो, अशी धमकी जखमीने त्यांना दिली. त्यामुळे मित्रांनी त्याला रुग्णालयात न नेता दुचाकीवरून खाली उतरविले. त्याच्या डोक्यात दगड मारल्यामुळे तरुणाचा जागीच मृत्यू झाला.
मृतदेह दुचाकीवरून नाशिकफाटा उड्डाणपुलावर नेला
आरोपींनी तरूणाचा मृतदेह दुचाकीवरून नाशिकफाटा येथील उड्डाणपुलावर नेला. पुलावर सीसीटीव्ही कॅमेरा नसल्याची संधी साधून त्यांनी तरुणाचा मृतदेह पुलावरून खाली पुणे-मुंबई महामार्गावर फेकून दिला. तरूण पुलावरून पडल्याने त्याच्या डोक्याला मार लागून त्याचा मृत्यू झाल्याचे भासवले. दरम्यान, महामार्गावर पडल्यानंतर अज्ञात वाहनाची धडक बसून तरुणाचा मृत्यू झाला, असे गृहित धरून भोसरी पोलिस ठाण्यात नोंद केली होती. दरम्यान, मृत्युमुखी पडलेल्या तरुणाचे दोन्ही मित्र ६ महिन्यांनंतर दारू पिण्यासाठी एकत्र बसले होते. त्यावेळी त्यांचे भांडण सुरू असताना त्यातील एक मित्र नशेत बरळला. सहा महिन्यांपूर्वी आम्ही एकाचा खून केला आहे. तशीच तुझी गेम करू, अशी धमकी दिली. त्यांनी नशेत दिली. ही माहिती खबर्यांनी वाकड पोलिसांना दिली. त्यानंतर वाकड पोलिसांनी तपास करून गुन्ह्याची उकल करीत आरोपींना अटक केली.
मृतदेहाची ओळख पटली नाही, म्हणून अपघाताची नोंद
नाशिक फाटा महामार्गावर तरूण मृतावस्थेत मिळून आल्याची घटना १६ मार्च २०२३ उघडकीस आली होती. त्यावेळी भोसरी पोलिस ठाण्यात बेवारस मृतदेह अशी नोंद केली. दरम्यान, वाकड पोलिसांनी सहा महिन्यांनंतर प्रकरणात तपास करून खुनाची उकल केली. संबंधित तरुण व्यसनाच्या आहारी गेला असल्यामुळे तो घरी जात नव्हता. त्यामुळे कुटूंबियांनीही त्याचा शोध घेतला नाही. तो मित्रांसोबत दारू प्यायला गेला होता. त्यानंतर तो बेपत्ता झाल्याचे वाकड पोलिसांच्या तपासात उघडकीस आले. त्यानंतर तरुणाच्या आईने मुलगा बेपत्ता झाल्याची नोंद वाकड पोलिस ठाण्यात केली. वाकड पोलिसांनी खून प्रकरणाचा छडा लावत ३६ तासांत दोन संशयितांना बेड्या ठोकल्या.
खबर्याने दिली हेड कॉन्स्टेबलला माहिती
वाकड पोलिस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बिभीषण कन्हेरकर यांना खबर्याने दारुच्या नशेत बोललेल्याची माहिती दिली. त्यानुसार तत्कालीन वरिष्ठ पोलिस निरीक्षक गणेश जवादवाड यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाचे तत्कालीन सहायक पोलिस निरीक्षक संतोष पाटील, उपनिरीक्षक सचिन चव्हाण यांनी गुन्ह्याच्या तपासाची चक्रे फिरवली. संशयितांचे मोबाइल लोकेशनसह इतर तांत्रिक पद्धतीने तपास केला. संशयितायांच्या मित्रांची माहिती घेतली असता, थेरगावरातील त्यांचा एक मित्र बेपत्ता असल्याची माहिती मिळाली. त्याच्या घरच्यांशी संपर्क साधून पोलिसांनी माहिती घेत खूनाची उकल केली.
थेरगावमधील तरुणाला त्याच्या मित्रांनी पुलावरून खाली फेकले. अपघाताचा बनाव केला. पुलाखालील सीसीटीव्ही फुटेजमधून तरूणाने उडी मारल्याचे दिसून येत होते. त्यामुळे अपघाताची नोंद केली होती. मात्र, आमच्या खबर्यांनी माहिती दिल्यानंतर गुन्ह्याची उकल केली. रहाटणीसह चिखलीत राहणार्या दोघांना पोलिसांनी अटक केली. – गणेश जवादवाड, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, वाकड पोलीस ठाणे