बंडगार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – जिल्हा सहकारी बँकेत नोकरीच्या आमिषाने फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी बंडगार्डन पोलिसांनी एकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी ऋषीकेश गणेश वाघमारे (रा. सपकाळवाडी, ता. इंदापूर, जि. पुणे) याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
तब्बल दीड काेटींच्या खंडणीसाठी व्यापाऱ्याचे अपहरण – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरुण पिंपरी-चिंचवडमधील कासारवाडी भागात राहायला आहे. आराेपी वाघमारे याची तरुणाशी एका परिचितामार्फत ओळख झाली होती. आरोपीने तक्रारादारच्या पत्नीला पुणे जिल्हा सहकारी बँकेत नोकरीला लावण्याचे आमिष दाखविले होते. नोकरी लावण्यासाठी आरोपीने तरुणाकडून दोन लाख रुपये घेतले. त्यानंतर तरुणाला पुणे जिल्हा सहकारी बँकेच्या आवारात गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात बोलाविले. वाघमारेने तरुणाला मुख्य अधिकाऱ्यांच्या नावाने बनावट नियुक्तीपत्र दिले. तरुणाने चौकशी केली. तेव्हा नियुक्तीपत्र बनावट असल्याचे उघडकीस आले. आरोपीकडे तरुणाने विचारणा केली, तसेच पैसे परत करण्याची मागणी केली. वाघमारेने पैसे परत करण्यास टाळाटाळ सुरू केली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरुणाने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. पोलीस उपनिरीक्षक गणेश चव्हाण तपास करत आहेत.





















