कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाला सुरुवात
marathinews24.com
पुणे – राम नदीला पुनरुज्जीवित करण्यासाठी तिच्या उगमस्थानापासून संगमापर्यंत सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे. या नदीची वारी-परिक्रमा व्हावी. नदीशी संवाद साधत मानव निर्मित चुकांमुळे तिचे झालेले प्रदुषण कमी करणे अत्यंत गरजेचे आहे. त्याच प्रमाणे नदी परिसरातील नैसर्गिक अधिवासही जतन करणे हे मानवाचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ पर्यावरण- पाणी तज्ज्ञ व गोमुखचे अध्यक्ष प्रा. विजय परांजपे यांनी केले. राम नदी प्रदूषित होण्यास मानवच जबाबदार आहे, हा मुद्दा त्यांनी अधोरेखित केला.
नारी शक्ती वंदन अधिनियमासाठी उद्यापासून संसदेचे तीन दिवसीय विशेष अधिवेशन – सविस्तर बातमी
राम नदीशी नाते निर्माण व्हावे, तिच्या जैवविविधतेचा अभ्यास व्हावा, तिची स्वच्छता राखण्यासाठी युवा पिढी प्रेरित व्हावी या उद्देशाने गेल्या पाच वर्षांपासून कोहिनूर कट्टा आयोजित कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाचा शुभारंभ आज (दि. १६) प्रा. विजय परांजपे यांच्या हस्ते कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सवाच्या पोस्टरचे अनावरण करून झाला. त्या वेळी ते ‘राम नदी काल-आज-उद्या’ या विषयावर बोलत होते. कोहिनूर ग्रुपचे संचालक विनीत गोयल, संयोजक वीरेंद्र चित्राव, अनिल गायकवाड मंचावर होते. दि. १८ एप्रिल पर्यंत पत्रकार भवन येथे महोत्सव सुरू असणार आहे.
महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची निर्मिती असलेले राम नदी विषयक लघुपट या वेळी प्रदर्शित करण्यात आले. विद्यार्थ्यांशी संवाद साधताना प्रा. विजय परांजपे पुढे म्हणाले, नदीचे संरक्षण-संवर्धन याविषयी अभ्यास करताना नदीतील जीवंत झरे, खडक, धबधबे यांचा अभ्यास करणे आवश्यक असून मानवनिर्मित प्रदूषणामुळे झालेला नदीचा ऱ्हास समजून घेऊन त्या चुका पुन्हा होऊ न देता सुधार करणे आवश्यक आहे. नदीच्या पाण्यात स्वशुद्धिकरणाची यंत्रणा अस्तित्वात असतेच; परंतु मानवाने छोट्या छोट्या प्रक्रियांमधून नदीच्या पाण्याची शुद्धता सांभाळणे त्या करिता नदीला येऊन मिळणाऱ्या नाले-ओढ्यांचे शुद्धिकरण करणे आवश्यक आहे. नदीची परिक्रमा करा, त्यातील वैशिष्ट्ये नोंदवा, पाण्याच्या गुणवत्तेची तपासणी करा आणि विश्लेषण करा असा सल्लाही त्यांनी विद्यार्थ्यांना दिला.
विनीत गोयल म्हणाले, भारतीय परंपरेत नदीला मातेसमान समजले जाते. तिचे पूजन केले जाते. नदी प्रदूषित झाल्यास संपूर्ण सृष्टीचे चक्र बिघडते. त्यामुळे नद्या स्वच्छ राहणे अत्यंत गरजेचे आहे. हे कार्य कुणा एकट्याचे नसून या करिता योग्य त्या मार्गदर्शनाखाली समाजाने एकत्र काम करणे आवश्यक आहे. कोहिनूर राम नदी चित्रपट महोत्सव युवा पिढीसाठी प्रेरक असून या उपक्रमास सातत्याने सहकार्य करू अशी ग्वाही त्यांनी दिली.
सातत्याने दुर्लक्षित राहिलेल्या १९.२ किमी लांबीच्या राम नदीचा प्रवाह पूर्वीप्रमाणे जास्तीत जास्त शुद्ध व्हावा आणि ती अविरल व निर्मल व्हावी या उद्देश्याने सातत्याने काम चालू आहे. अशी नदी शांतता प्रिय व आनंदी समाज घडविण्यासाठी मदत करेल. यातून भावी पिढ्यांसाठी समृद्ध निसर्ग निर्माण होईल. नदीच्या पुनरुज्जीवनासाठी सर्व समावेशक व शाश्वत प्रारूप तयार करण्याच्या प्रयत्नाचा एक भाग म्हणजे हा महोत्सव असल्याचे वीरेंद्र चित्राव यांनी प्रास्ताविकात सांगितले. महोत्सवानिमित्त दाखविण्यात येत असलेल्या लघुपटांचे जागतिक स्तरावर कौतुक होत आहे, असेही ते म्हणाले.





















