पुणे ग्रामीण पोलिसांची कामगिरी
marathinews24.com
पुणे – जिल्ह्यातील विविध भागात दरोडा टाकून लुटमार करीत एकाच रात्रीत पाच ठिकाणी दरोडा टाकून लाखो रूपयांचा ऐवज लुटूणार्या सराईत टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेसह दौंड पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. टोळीने केलेले घरफोडीचे तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस आणून १७ तोळे दागिने, ३२४ ग्रॅम चांदी असा २५ लाखांच ऐवज जप्त केला आहे. चोरी केल्यानंतर घरी न जाता सराईत शेतात लपून बसत असल्याचे तपासात उघडकीस आले आहे, अशी माहिती पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, पोलीस निरीक्षक हेमंत शेंडगे उपस्थित होते.
पुण्यात पूर्ववैमनस्यातून तरूणाचा केला खून – सविस्तर बातमी
गणेश मंगेश काळे (वय २२, रा. कुळधरण, अहिल्यानगर) विशाल हंबरड्या काळे (वय २१, रा. चिखली, आष्टी, बीड) किशोर रावण भोसले (वय १९ रा. बाभुळगाव खालसा ता. कर्जत, अहिल्यानगर अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्या अल्पवयीन साथीदाराला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
पुणे जिल्ह्यातील दौंड, बारामती, जुन्नर भागात मागील सहा महिन्यांपासून जबरी चोरीच्या घटना घडल्या होत्या. तसेच वाटसरूंना हत्याराचा धाक दाखवून लुटण्यात आले होते. तर १० जूनला दौंडच्या हद्दीत एकाच रात्री चार आणि श्रीगोंदा परिसरात एक अशा मिळून पाच ठिकाणी घरफोडी झाली होती. प्रामुख्याने खोरवडीत घरफोडी करून ७ लाखांचा ऐजव चोरी करून टोळीने धाडसी दरोडा टाकला होता. याप्रकरणी पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल यांनी तपास करण्यासाठी ६ पथकांची नियुक्ती केली. संबंधित पथकांनी गुन्ह्याची पद्धत, वेळ, तांत्रिक विश्लेषण, सीसीटीव्ही फुटेज, आरोपींचे वर्णनाचा अभ्यास केला. तब्बल ५० किलोमीटरपर्यंत सीसीटीव्ही फुटेजचे चित्रीकरण तपासण्यात आले.
तपासादरम्यान आरोपी विशाल काळे, गणेश काळे, किशोर भोसले यांनी गुन्हा केल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली. संबंधित टोळीविरूद्ध यापुर्वी सशस्त्र दरोडा, जबरी चोरीसह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. ते घरात न राहता शेतात, माळावर, वीट भट्टीवर वेषातंर करून राहत असल्याचे तपासात निष्पन्न झाले. त्यानुसार १३ जूनला पथकाने विविध ठिकाणी शोधमोहिम राबवून तिघांना अटक केली. त्यांच्या एका अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेतले. चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली. ही कामगिरी विशेष पोलीस महानिरीक्षक रंजनकुमार शर्मा, पोलीस अधीक्षक संदीपसिंह गिल्ल, अपर अधीक्षक शुभम कुमार , अपर अधीक्षक गणेश बिरादार, डीवायएसपी बापुराव दडस, पोलीस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर, एपीआय कुलदीप संकपाळ, उपनिरीक्षक अभिजीत सावंत, बाळासाहेब कारंडे, शिवाजी निकम, असिफ शेख, सचिन घाडगे, किशोर तेलंग, योगेश नागरगोजे यांनी केली.
तब्बल २० गंभीर गुन्हे उघडकीस
पुणे जिल्ह्यात सराईत टोळीने दौंड, माळेगाव, जेजुरी,जुन्नर, आळेफाटा, बारामती तालुका, यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत १२ ठिकाणी घरफोडी केली आहे. तर अहिल्यानगर जिल्ह्यातील मिरजगाव, कर्जत या दोन पोलीस ठाण्याच्या हद्दीत ८ ठिकाणी घरफोडी केल्याचे उघडकीस आले आहे. दरम्यान, पुणे पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने मागील अडीच महिन्यांत दरोडा, जबरी चोरी, घरफोडीचे गुन्हे उघडकीस आणून ९०० गॅ्रम सोन्याचे दागिने जप्त केले आहेत.





















