चालकाला आंबेगाव पोलिसांनी केली अटक
marathinews24.com
पुणे – भरधाव टेम्पो चालकाने दिलेल्या धडकेत पादचारी नागरिकाचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी टेम्पो चालकाला आंबेगाव पोलिसांनी अटक केली आहे. हा अपघात १६ जूनला रात्री पावणेनउच्या सुमारास कात्रजहून नवले ब्रीजकडे जाणार्या प्यारोनामा सोसायटीसमोर घडला आहे. राजू विठ्ठलराव भद्रे (वय ५५, रा. आंबेगाव पठार) असे ठार झालेल्या पादचार्याचे नाव आहे. याप्रकरणी माणिक सखाराम कदम (वय ४५, रा. आंबेगाव पठार) याला अटक केली आहे. संकेत भद्रे (वय २७) यांनी आंबेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पुण्यातील नवी पेठेत महिलेचे मंगळसूत्र हिसकावले – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार संकेत भद्रे यांचे वडील राजू भद्रे हे १६ जूनला रात्री साडेआठच्या सुमारास प्यारोनामा सोसायटीसमोरून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी माणिक कदम याने भरधाव वेगाने टेम्पो चालवून राजूला धडक दिली. त्यामुळे ते गंभीररित्या जखमी झाले. त्यांना रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक मारूती वाघमारे तपास करीत आहेत.
चांगल्या परताव्याचे आमिष पडले २६ लाखांना
बुकींग टास्क पुर्ण केल्यानंतर चांगल्या परताव्याच्या आमिषाला बळी पडून ३६ वर्षीय तरूणाने तब्बल २६ लाख २७ हजार रूपये गमावले आहेत. ही घटना ११ ते २४ मे २०२५ कालावधीत वाघोलीत घडली आहे. याप्रकरणी तरूणाने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार मोबाइलधारक, लिंकधारक, बँकखातेधारकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार तरूण हा वाघोलीत राहायला असून, ११ मे २०२५ रोजी सायबर चोरट्यांनी टेलीग्राम अॅपद्वारे त्याच्याशी संपर्क साधला होता. वेब पोर्टलवर दिलेले टास्क पुर्ण केल्यानंतर चांगला परतावा देण्याचे आमिष सायबर चोरट्यांनी तरूणाला दाखविले होते. त्यानंतर आमिषाला बळी पडून तरूणाने गुंतवणूकीला सुरूवात केली. अवघ्या १३ दिवसांत तब्बल २६ लाख २७ हजार रूपये गुंतवणूक करूनही त्यांना परतावा मिळाला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर तरूणाने वाघोली पोलीस ठाण्यात धाव घेतली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक पल्लवी मेहेर तपास करीत आहेत.



















