भाजप भटके विमुक्त मोर्चाची पुणे पोलीस आयुक्तांना निवेदन
marathinews24.com
पुणे – भटके विमुक्त समाजाबाबत आक्षेपार्ह वक्तव्य करणाऱ्या गिरीश गायकवाड याच्याविरोधात समाजामध्ये तीव्र संतापाची लाट उसळली आहे. संबंधित व्यक्तीवर तात्काळ गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करण्याच्या मागणीसाठी भाजप भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली पुणे पोलीस आयुक्तांना गुरुवारी (दि.१८) निवेदन देण्यात आले. कारवाई न झाल्यास उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही भाजप भटके विमुक्त मोर्चातर्फे देण्यात आला आहे. यावेळी समाजातील शेकडो बांधव, महिला, युवक, कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भटके विमुक्त समाजाबाबत वापरण्यात आलेले कथित शब्द हे अपमानास्पद असून त्यामुळे संपूर्ण समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या आहेत. अशा प्रकारच्या वक्तव्यामुळे समाजामध्ये तीव्र असंतोष निर्माण झाला असून संबंधित व्यक्तीविरोधात तातडीने गुन्हा दाखल करून अटक करण्याची मागणी त्यांनी केली आहे. संबंधित व्यक्तीच्या वक्तव्याचा तीव्र निषेध करत घोषणाबाजीही करण्यात आली. समाजाच्या सन्मानाशी तडजोड केली जाणार नाही, तसेच भविष्यात कोणत्याही समाजाविषयी अवमानकारक भाषा वापरणाऱ्यांविरोधात कठोर भूमिका घेतली जाईल, असा इशाराही यावेळी प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी दिला आहे.
भटके विमुक्त मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष नरेंद्र पवार यांनी सांगितले की, भटके विमुक्त समाज हा राज्याच्या सामाजिक, सांस्कृतिक आणि आर्थिक जडणघडणीत महत्त्वाचे योगदान देणारा समाज आहे. त्यामुळे समाजाचा अपमान करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला कायद्याच्या चौकटीत कठोर शिक्षा झाली पाहिजे. प्रशासनाने या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन योग्य ती कारवाई करावी, अन्यथा आम्हाला उग्र आंदोलन करावे लागेल. दरम्यान, या प्रकरणामुळे भटके विमुक्त समाजामध्ये तीव्र नाराजीचे वातावरण असून राज्यभरातून विविध सामाजिक संघटना आणि समाजबांधवांनी या घटनेचा निषेध व्यक्त केला आहे.
भाजपचे प्रदेश सरचिटणीस शिवाजी आव्हाड राजू शेठ साळुंखे, राजेश धोत्रे, शक्ती सिंग कल्याणी, सविता पवार, प्रकाश गायकवाड तुषार जाधव, सुमन गायकवाड, चंद्रकांत जाधव दिनकर गायकवाड, लक्ष्मण जाधव, श्री हरी सावंत यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते





















