पालखी सोहळ्यात पाहायला मिळाला फिजिओथेरपी, आरोग्य मार्गदर्शन व समाजसेवेचा अनोखा संगम
marathinews24.com
पुणे – आषाढी वारीनिमित्त वारकरी भाविकांच्या आरोग्याची काळजी घेण्यासाठी सूर्यदत्त इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ सायन्सेस कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्च आणि मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष यांच्या संयुक्त विद्यमाने ‘आरोग्य भारती – चरण सेवा’ या विशेष आरोग्य सेवा शिबिराचे यशस्वी आयोजन करण्यात आले. पुण्यातील नाना पेठ येथे आयोजित या समाजोपयोगी उपक्रमात २५० हून अधिक वारकऱ्यांनी सेवा, आरोग्य तपासणी व मार्गदर्शनाचा लाभ घेतला.
आषाढी वारीत “महिला उन्नती वारी” उपक्रमाद्वारे महिला सक्षमीकरणाचा संदेश – सविस्तर बातमी
सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या प्रेरणादायी नेतृत्वातून आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना समाजसेवेची अनोखी मानवंदना म्हणून हा उपक्रम आयोजित करण्यात आला. ‘संस्कार, संस्कृती आणि शिक्षण’ या त्रिवेणीवर आधारित हा सेवा उपक्रम प्राचार्या डॉ. सिमी रेठरेकर व प्राचार्या डॉ. सारिका झांबड यांच्या पुढाकाराने राबविण्यात आला.
आषाढी वारीदरम्यान शेकडो किलोमीटर पायी प्रवास करणाऱ्या वारकरी भाविकांना होणारा स्नायू व सांध्यांचा ताण, पायातील वेदना, थकवा आणि इतर शारीरिक त्रास लक्षात घेऊन कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी प्रा. डॉ. चैताली नेवे (पीटी), डॉ. आयझॅक साळवे (पीटी) आणि डॉ. अक्षता माने (पीटी) यांच्या मार्गदर्शनाखाली वारकऱ्यांची सखोल तपासणी करून आवश्यक फिजिओथेरपी उपचार दिले. यामध्ये वेदनाशामक उपचार, सॉफ्ट टिश्यू व मायोफॅशियल रिलिज, जॉइंट मोबिलायझेशन, स्ट्रेचिंग व स्ट्रेंथनिंग व्यायाम, शरीरस्थिती सुधारणा, चालण्याचे प्रशिक्षण (गेट ट्रेनिंग), संतुलन व कार्यक्षमतेसाठी व्यायाम, आवश्यकतेनुसार किनेसिओ टेपिंग, घरच्या घरी करण्यासाठी व्यायाम, योग्य चालण्याबाबत मार्गदर्शन, दुखापत प्रतिबंधक उपाय तसेच किरकोळ स्नायू व सांध्यांच्या दुखापतींवरील प्रथमोपचार अशा विविध सेवा पुरविण्यात आल्या.
याचबरोबर सूर्यदत्त कॉलेज ऑफ फार्मसी, हेल्थकेअर अँड रिसर्चमधील पदवी व पदविका फार्मसी अभ्यासक्रमातील विद्यार्थी व प्राध्यापकांनी वारकऱ्यांसाठी पायांची मालिश (फूट मसाज), प्राथमिक आरोग्य तपासणी, औषधोपचार, आरोग्य समुपदेशन, आवश्यक वैद्यकीय मार्गदर्शन तसेच इतर समाजोपयोगी सेवा दिल्या. या दोन्ही महाविद्यालयांच्या विद्यार्थी-शिक्षकांनी समन्वयाने दिलेल्या या सेवेमुळे वारकऱ्यांना शारीरिक थकवा व वेदनांपासून दिलासा मिळाला. दीर्घ पायी वारीदरम्यान आरोग्याची काळजी कशी घ्यावी, पायांची योग्य निगा कशी राखावी आणि दुखापतींपासून बचावासाठी कोणती खबरदारी घ्यावी याबाबतही उपयुक्त मार्गदर्शन करण्यात आले. या सेवाभावी उपक्रमाचे वारकरी भाविकांनी मनापासून स्वागत करत सूर्यदत्तच्या विद्यार्थी-शिक्षकांच्या सामाजिक बांधिलकीचे आणि मानवसेवेच्या भावनेचे कौतुक केले.
शिबिरात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी या उपक्रमाचे मनापासून कौतुक करत फिजिओथेरपी उपचार आणि आरोग्य सेवेमुळे मोठा दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त केली. रास्ता पेठ येथील मराठा मित्र मंडळाचे सदस्य उमेश शेडगे यांनी प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया यांच्या समाजाभिमुख कार्याचे आणि विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्वाची भावना रुजविण्याच्या त्यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांचे विशेष कौतुक केले.
प्रा. डॉ. संजय बी. चोरडिया म्हणाले, “आषाढी वारी ही केवळ श्रद्धेची परंपरा नसून सेवा, समर्पण आणि मानवतेचा उत्सव आहे. वारकरी भाविकांची सेवा करण्याची संधी मिळणे हे आमच्यासाठी भाग्याची बाब आहे. ‘संस्कार, संस्कृती आणि शिक्षण’ या सूर्यदत्तच्या मूल्यांसोबत समाजसेवेची भावना प्रत्येक विद्यार्थ्यामध्ये रुजावी, हा आमचा सातत्यपूर्ण प्रयत्न आहे. ‘आरोग्य भारती – चरण सेवा’ या उपक्रमातून विद्यार्थ्यांनी आपल्या ज्ञानाचा उपयोग समाजाच्या सेवेसाठी करत ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश प्रत्यक्ष कृतीतून दिला आहे. भविष्यातही सूर्यदत्त विविध सामाजिक, आरोग्यविषयक आणि जनकल्याणकारी उपक्रमांद्वारे समाजाशी असलेली आपली बांधिलकी अधिक दृढ करत राहील.”
या उपक्रमातून ‘मानवसेवा हीच ईश्वरसेवा’ हा संदेश प्रभावीपणे अधोरेखित झाला. वारकरी भाविकांचा प्रवास अधिक सुरक्षित, निरोगी आणि सुखकर व्हावा या उद्देशाने राबविण्यात आलेल्या या उपक्रमासाठी सूर्यदत्त एज्युकेशन फाउंडेशनच्या व्यवस्थापनाने कॉलेज ऑफ फिजिओथेरपी, कॉलेज ऑफ फार्मसी, मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष, सर्व प्राध्यापक, विद्यार्थी आणि आयोजकांचे अभिनंदन करून समाजहितासाठी असे सेवा उपक्रम भविष्यातही सातत्याने राबविण्याचा संकल्प व्यक्त केला.
























