दोन्ही नद्यांच्या खोऱ्यात छोटी धरणे बांधण्याची मागणी
marathinews24.com
ठाणे – ठाणे जिल्ह्यातील मुरबाड तालुक्यात मुंबईसह ठाणे, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, अंबरनाथ आणि बदलापूर सारख्या वाढत्या उपनगरांना पिण्याच्या पाण्यासाठी प्रस्तावित असलेल्या काळू धरण व शाई धरण यांना शेतकरी व स्थानिक रहिवासी यांचा विरोध असल्याची ठाम भूमिका ” काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था, काळू परिसर यांच्या शिष्टमंडळाने खाजगी कार्यक्रमाच्या निमित्ताने मुरबाड दौऱ्यावर असलेल्या राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांची भेट घेऊन मांडली आहे. सद्या काळू धरणाच्या संभाव्य बाधित क्षेत्रातील सुरू असलेल्या प्रशासकीय हालचाली त्यामुळे निर्माण झालेले शेतकरी प्रश्न या विषयी चर्चा केली.
खासदार विनायक राऊत यांच्या सुनेच्या तक्रारीची डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली गंभीर दखल – सविस्तर बातमी
स्थानिकांमध्ये धरण विरोधी असलेल्या असंतोषाची दखल घेऊन न्याय देण्याची मागणी केली. सरकारच्या या अन्यायकारक काळू व शाई या मोठ्या प्रकल्पांऐवजी दोन्ही नद्यांच्या परिसरातील खोऱ्यात छोटी छोटी धरणे बांधल्यास शहराच्या पाण्याची तहान भागवून स्थानिकांना सिंचन आणि पिण्यासाठी सुद्धा पाणी उपलब्ध करता येईल. त्याकरिता काळू नदी धरणग्रस्त सामाजिक संस्था यांनी सुचवलेल्या १६ संभाव्य ठिकाणचे सर्व्हेक्षण करून तसा अहवाल बनविण्याची मागणी करण्यात आली.
यावेळी सुनेत्रा पवार यांनी धरण क्षेत्रातील जनसामान्यांच्या भावना शिष्टमंडळ यांच्याकडून जाणून घेतल्या व योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले असल्याचे ज्येष्ठ शेतकरी नेते हरिभाऊ राऊत यांनी सांगितले. याप्रसंगी ठाणे जिल्हा देशमुख मराठा समाजोन्नती मंडळाचे अध्यक्ष विलासकाका देशमुख, माहिती अधिकार महासंघ ठाणे जिल्हाध्यक्ष संतोष राऊत, शेतकरी प्रतिनिधि प्रविण देशमुख, संभाजी गोडांबे, रघुनाथ देशमुख व खुटल बा ग्रामपंचायतचे उपसरपंच भावेश पठारे यांच्यासह संस्थेचे कार्याध्यक्ष गणेश देशमुख, चिटणीस विलास पठारे, कोषध्यक्ष शाम देशमुख, सह-सचिव कैलास निमसे, सह-कोषअध्यक्ष रोशन चौधरी पदाधिकारी उपस्थित होते.
























