ग्रामीण नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासनाचे संपर्क केंद्र सुरू करण्याची मागणी
marathinews24.com
पुणे – राज्यातील प्रत्येक तालुक्यात अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाचे संपर्क कक्ष सुरू करण्यात यावेत, अशी मागणी ओमप्रकाश आदमवाड यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
काळू व शाई धरणवासियांच उपमुख्यमंत्री सुनेत्राताईंना साकडं – सविस्तर बातमी
ग्रामीण भागातील नागरिकांना भेसळयुक्त अन्नपदार्थ, बनावट औषधे आणि निकृष्ट दर्जाच्या उत्पादनांविरोधात तक्रारी नोंदविताना अनेक अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. सध्या एफडीएची बहुतांश कार्यालये जिल्हा स्तरावर असल्याने तालुका व ग्रामीण भागातील नागरिकांना तक्रार दाखल करण्यासाठी जिल्हा मुख्यालयात जावे लागते. त्यामुळे वेळ, पैसा आणि प्रवासाचा अतिरिक्त भार सहन करावा लागतो. परिणामी, अनेक नागरिक तक्रार करण्यास टाळाटाळ करतात आणि भेसळयुक्त अन्नपदार्थ तसेच बनावट औषधांविरोधातील अनेक प्रकरणे नोंदविली जात नाहीत.
ही समस्या दूर करण्यासाठी प्रत्येक तालुक्यातील तहसील कार्यालय, नगरपालिका किंवा नगर परिषद येथे एफडीएचे संपर्क कक्ष सुरू करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
या संपर्क कक्षांमार्फत नागरिकांच्या तक्रारी स्वीकारणे, अन्न व औषधांबाबत जनजागृती करणे, संशयित अन्न व औषधांचे नमुने तपासणीसाठी स्वीकारणे तसेच नियमित तपासणी व जनजागृती मोहिमा राबविणे अधिक प्रभावीपणे शक्य होईल, असेही ओमप्रकाश यांनी निवेदनात म्हटले आहे.























