राजीनाम्याच्या मागणीपलीकडे जाऊन प्रश्नपत्रिका तयार होण्यापासून निकालापर्यंतच्या संपूर्ण प्रक्रियेची फास्टट्रॅक चौकशी; विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी मुख्यमंत्री–विद्यार्थी थेट संवाद आवश्यक
marathinews24.com
पुणे – MPSC Students Protest : महाराष्ट्रातील स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा आक्रोश दिवसेंदिवस तीव्र होत आहे. एमपीएससीच्या परीक्षा, कथित पेपरफुटी, परीक्षा पुढे ढकलणे, भरती प्रक्रियेतील अनिश्चितता आणि परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा प्रश्न या सगळ्या पार्श्वभूमीवर पुण्यात विद्यार्थ्यांचे आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला आता राजकीय रंग चढल्याची टीका आणि प्रतिटीकाही सुरू झाली आहे. मात्र या सगळ्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांमध्ये केंद्रस्थानी असलेला विद्यार्थी मात्र पुन्हा एकदा दुर्लक्षित होण्याची भीती आहे.
दुष्काळी परिस्थितीत फळबाग व्यवस्थापन ; पाणी वाचवा, फळझाडे जगवा – विशेष लेख, सविस्तर वाचा
वास्तवाची ओळख आणि सध्याच्या परिस्थितीवर बोलणारा आवाज म्हणून राजसाहेब ठाकरे यांच्या भूमिकेकडे पाहिले जात आहे. दुसरीकडे, आंदोलनाला जातीय रंग दिला जात असल्याच्या आरोप-प्रत्यारोपांमुळे विद्यार्थ्यांच्या मूळ प्रश्नांपेक्षा राजकीय चर्चा अधिक पुढे येत असल्याचे चित्र आहे. आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वाखालील आंदोलनाला (MPSC Students Protest) महाविकास आघाडीतील नेत्यांचा पाठिंबा मिळत असताना भाजपकडूनही या आंदोलनाच्या राजकीय स्वरूपावर प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मात्र प्रश्न साधा आहे-विद्यार्थ्यांना राजकारण नकोय; त्यांना निष्पक्ष परीक्षा हवी आहे.
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा घ्यावा की नाही, हा स्वतंत्र विषय आहे. परंतु माझ्या मते केवळ अध्यक्षांच्या राजीनाम्याने विद्यार्थ्यांच्या प्रश्नाचे मूळ उत्तर मिळणार नाही. त्यापेक्षा २०२१ ते २०२६ या कालावधीत झालेल्या एमपीएससीच्या सर्व महत्त्वाच्या परीक्षांची स्वतंत्र आणि निष्पक्ष ऑडिट चौकशी झाली पाहिजे. या चौकशीत केवळ पेपर फुटला की नाही, एवढाच प्रश्न नसावा. प्रश्नपत्रिका तयार करणाऱ्या यंत्रणेपासून त्याची छपाई, सुरक्षित साठवणूक, वाहतूक, परीक्षा केंद्रापर्यंत पोहोचविणे आणि अखेर विद्यार्थ्याच्या हातात प्रश्नपत्रिका मिळेपर्यंतच्या प्रत्येक टप्प्याचे ऑडिट झाले पाहिजे.
यामध्ये आयोगातील अधिकारी-कर्मचारी, प्रश्नपत्रिका छपाईशी संबंधित संस्था, वाहतूक व्यवस्था, परीक्षा केंद्रावरील यंत्रणा तसेच संबंधित सरकारी अथवा खासगी संस्थांची भूमिका तपासली पाहिजे. त्याचबरोबर २०२१ ते २०२६ या कालावधीत विविध एमपीएससी परीक्षांमध्ये अंतिमतः पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या निवडीची प्रक्रिया देखील स्वतंत्र पद्धतीने तपासली गेली पाहिजे. कोणत्याही विद्यार्थ्यावर संशय घेणे हा या मागणीचा उद्देश नसून, संपूर्ण निवड प्रक्रियेवरील विश्वास पुन्हा निर्माण करणे हा उद्देश असला पाहिजे. आज प्रश्न केवळ एका परीक्षेचा नाही. प्रश्न आहे तो परीक्षा व्यवस्थेवरील विश्वासाचा.
फास्टट्रॅक चौकशीची गरज
(MPSC Students Protest) न्यायालयात महत्त्वाच्या प्रकरणांसाठी ज्या पद्धतीने फास्टट्रॅक सुनावणीची व्यवस्था केली जाते, त्याच धर्तीवर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी संबंधित या प्रकरणाची वेगवान, स्वतंत्र आणि वेळबद्ध चौकशी झाली पाहिजे. चौकशी कोण करणार, किती दिवसांत करणार आणि त्याचा अहवाल कधी जाहीर करणार, याचे स्पष्ट वेळापत्रक सरकारने जाहीर केले पाहिजे.
चौकशीचा अहवाल विद्यार्थ्यांसमोर पारदर्शकपणे मांडला गेला, तरच दोषी कोण आणि निर्दोष कोण याचे उत्तर मिळेल. दोषी आढळणाऱ्या व्यक्तीवर मग तो आयोगातील अधिकारी असो, कर्मचारी असो, प्रश्नपत्रिका छपाई करणारी खासगी संस्था असो किंवा परीक्षा केंद्राशी संबंधित व्यक्ती असो-कठोर कारवाई झाली पाहिजे.
विद्यार्थी शेवटी मागतात तरी काय?
विद्यार्थी काही अवास्तव मागत नाहीत, त्यांना एक निष्पक्ष परीक्षा हवी आहे, त्यांना पेपरफुटीमुक्त परीक्षा हवी आहे, त्यांना वेळेत परीक्षा आणि वेळेत निकाल हवा आहे, त्यांना वेळेत भरती हवी आहे. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, त्यांनी वर्षानुवर्षे केलेल्या अभ्यासावर त्यांचा विश्वास कायम राहावा, एवढीच त्यांची अपेक्षा आहे. पुण्यासारख्या शहरांमध्ये अनेक विद्यार्थी ग्रामीण आणि शेतकरी कुटुंबांतून येतात. घरून काही महिन्यांच्या खर्चासाठी पैसे मागतानाही त्यांना आता विचार करावा लागतो. खोलीचे भाडे, मेस, क्लासेस, चहा-नाश्ता, लायब्ररी, प्रवास आणि इतर शैक्षणिक खर्च यामुळे स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांवर आर्थिक ताण वाढत आहे.
त्यात परीक्षा पुढे ढकलली जाते, भरती रखडते, पेपरफुटीच्या बातम्या येतात आणि पुन्हा नव्याने तयारी करावी लागते. त्यामुळे विद्यार्थ्यांचा केवळ आर्थिक नाही, तर मानसिक, सामाजिक आणि बौद्धिक ताणही वाढत आहे. वय वाढत चालले आहे. घरची जबाबदारी वाढत आहे. अनेकांच्या घरात शेती, मजुरी किंवा छोटा व्यवसाय हा उत्पन्नाचा मुख्य आधार आहे. अशा परिस्थितीत एक-दोन वर्षांचा विलंब म्हणजे विद्यार्थ्यांसाठी केवळ वेळेचा प्रश्न राहत नाही; तो त्यांच्या संपूर्ण आयुष्याच्या नियोजनाचा प्रश्न बनतो.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतरही प्रश्न कायम का?
एमपीएससी विद्यार्थ्यांच्या प्रश्नावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १० सप्टेंबरला विद्यार्थी-शिक्षकांच्या शिष्टमंडळाशी चर्चा केली होती. त्यावेळी परीक्षा व्यवस्थेतील सुधारणा, चौकशी आणि विद्यार्थ्यांच्या तक्रारींबाबत सरकारकडून विविध आश्वासने देण्यात आली होती. त्यानंतर ३० सप्टेंबर २०२६ रोजी मुख्यमंत्री आणि विद्यार्थी प्रतिनिधींची पुन्हा बैठक झाली. या बैठकीत विद्यार्थ्यांच्या मागण्यांवर सुमारे पावणेतीन तास चर्चा झाली. सरकारकडून आगामी परीक्षा ऑफलाइन घेणे, एमपीएससी सचिवांची बदली, संबंधित प्रकरणांची न्यायालयीन चौकशी, पुढील तीन वर्षांतील भरती प्रक्रियेचे नियोजन, सिंगल कार्ड प्रणाली आणि इतर सुधारणांबाबत आश्वासने देण्यात आली. या आश्वासनांनंतर २ ऑक्टोबरचे प्रस्तावित आंदोलन काही काळासाठी स्थगित करण्यात आले होते.
मात्र त्यानंतरही पुण्यात आंदोलन सुरू राहिले. त्यामुळे एक प्रश्न निर्माण होतो—सरकार आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींमध्ये चर्चा होऊनही जर रस्त्यावरचा संघर्ष संपत नसेल, तर सरकारने आणि विद्यार्थी नेतृत्वाने दोघांनीही आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे का?
विद्यार्थ्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या शिष्टमंडळाने सरकारशी चर्चा केली, मागण्या मांडल्या आणि सरकारकडून आश्वासने मिळवली. त्यानंतरही विद्यार्थी रस्त्यावर असतील, तर त्या आश्वासनांची अंमलबजावणी कितपत झाली, याचा स्पष्ट लेखाजोखा विद्यार्थ्यांसमोर ठेवला गेला पाहिजे. कारण शिष्टमंडळ हे विद्यार्थ्यांच्या आवाजाचे माध्यम आहे; अंतिम उत्तर मात्र विद्यार्थ्यांना मिळाले पाहिजे. मुख्यमंत्री स्वतः विद्यार्थ्यांमध्ये का जात नाहीत? आज सर्वांत मोठी गरज आहे ती थेट संवादाची.
मुख्यमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या प्रतिनिधींशी चर्चा केली आहे. मात्र आंदोलनाची तीव्रता पाहता, मुख्यमंत्री स्वतः आंदोलनस्थळी जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधतील, त्यांच्या समस्या ऐकतील आणि सरकारने घेतलेल्या निर्णयांची स्पष्ट माहिती देतील, तर विद्यार्थ्यांच्या मनातील अनेक गैरसमज दूर होऊ शकतात.
राजकारण कोणाचेही असो, सरकार कोणाचेही असो आणि आंदोलनाचे नेतृत्व कोणाचेही असो—विद्यार्थ्यांचे भविष्य हा कोणत्याही पक्षाच्या राजकारणापेक्षा मोठा विषय आहे.
राजीनाम्यापेक्षा व्यवस्थेची शस्त्रक्रिया महत्त्वाची
एमपीएससी अध्यक्षांचा राजीनामा हा विद्यार्थ्यांच्या आंदोलनातील प्रमुख मुद्दा असू शकतो. परंतु अध्यक्ष बदलला म्हणून परीक्षा व्यवस्था आपोआप पारदर्शक होईलच असे नाही. आज गरज आहे ती व्यवस्थेच्या संपूर्ण शस्त्रक्रियेची.
प्रश्नपत्रिका तयार करण्यापासून ते निकाल जाहीर होईपर्यंत प्रत्येक टप्प्यावर जबाबदारी निश्चित झाली पाहिजे. डिजिटल सुरक्षा, प्रश्नपत्रिका छपाई, वाहतूक, स्ट्राँगरूम, परीक्षा केंद्र, सीसीटीव्ही, कर्मचारी, निरीक्षक आणि मूल्यांकन या सर्व प्रक्रियांचे स्वतंत्र सुरक्षा ऑडिट झाले पाहिजे. दोषी व्यक्ती कितीही मोठ्या पदावर असली तरी कारवाई झाली पाहिजे आणि निर्दोष व्यक्तीला विनाकारण बदनाम केले जाऊ नये.
कारण शेवटी मरतोय कोण?
या सगळ्या संघर्षात राजकीय पक्ष एकमेकांवर आरोप करतील. नेते येतील-जातील. आंदोलनाची (MPSC Students Protest) व्यासपीठे बदलतील. पत्रकार परिषदा होतील. सोशल मीडियावर पोस्ट होतील. पण शेवटी नोकरीची संधी गमावणारा विद्यार्थी असतो, घरून पैसे मागताना अपराधी वाटणारा विद्यार्थी असतो, वय वाढल्याची चिंता करणारा विद्यार्थी असतो, परीक्षा पुढे ढकलली की पुन्हा अभ्यास सुरू करणारा विद्यार्थी असतो. आणि पेपरफुटीची बातमी आली की आपल्या वर्षानुवर्षांच्या मेहनतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे वाटणारा विद्यार्थीही तोच असतो. म्हणूनच या आंदोलनाला राजकीय चौकटीत न अडकवता आता विद्यार्थ्यांच्या भवितव्याच्या चौकटीतून पाहण्याची वेळ आली आहे.
अध्यक्षांचा राजीनामा घ्यायचा की नाही, हा निर्णय संबंधित घटनात्मक प्रक्रियेनुसार होईल. मात्र २०२१ ते २०२६ या कालावधीतील परीक्षा व्यवस्थेचे स्वतंत्र ऑडिट, वेळबद्ध न्यायालयीन/स्वतंत्र चौकशी, दोषींवर कठोर कारवाई आणि अहवाल विद्यार्थ्यांसमोर सार्वजनिक करणे—या मागण्या मात्र आजच्या परिस्थितीत अधिक मूलभूत ठरतात. कारण विद्यार्थ्यांना सत्ता नको, राजकारण नको, आश्वासनांचे कागद नकोत. त्यांना फक्त एकच गोष्ट हवी आहे—आपल्या कष्टाने मिळवलेली संधी निष्पक्षपणे आपल्या हातात यावी!
ओमप्रकाश आदमवाड
स्पर्धा परीक्षा विद्यार्थी व मुक्त पत्रकार, पुणे























