संशोधन कार्य, लोकसहभाग आणि प्रत्यक्ष कृतीतून नदी संवर्धनाचा संकल्प
marathinews24.com
पुणे – Mula Mutha River Conservation : पुणे शहराच्या भौगोलिक, सामाजिक आणि पर्यावरणीय रचनेत मुळा-मुठा नदीला महत्त्वाचे स्थान आहे. शहराचा विस्तार, वाढती लोकसंख्या आणि बदलती जमीनवापर पद्धती यामुळे नदी व तिच्या परिसरावर मानवी हस्तक्षेपाचा मोठा परिणाम होत आहे. नदीपात्रात साचणारा कचरा, विविध ठिकाणांहून होणारा सांडपाण्याचा प्रवाह, नदीकाठावरील अस्वच्छता, अतिक्रमणे, काँक्रीटीकरण आणि नदीच्या नैसर्गिक परिसंस्थेतील बदल या समस्यांवर दीर्घकालीन उपाययोजना करण्याच्या उद्देशाने पुण्यातील तरुणांनी नदीपात्रातील पांचाळेश्वर येथे एकत्र येत सविस्तर चर्चा केली.
श्री महालक्ष्मी मंदिरातील ‘शृंगार’ या संकल्पनेवरील सजावट व विद्युतरोषणाईचे उद्घाटन – सविस्तर बातमी
घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर आयोजित या बैठकीत मुळा-मुठा संवर्धन समितीच्या माध्यमातून नदी संवर्धनासाठी सातत्यपूर्ण आणि शास्त्रीय पद्धतीने काम करण्याचा निर्धार करण्यात आला. (Mula Mutha River Conservation) नदी संवर्धनाचे काम केवळ प्रसंगी स्वच्छता मोहीम राबविण्यापुरते मर्यादित न ठेवता नदीची प्रत्यक्ष स्थिती समजून घेऊन त्यावर आधारित दीर्घकालीन कृती आराखडा तयार करण्याची आवश्यकता यावेळी व्यक्त करण्यात आली.
नदीच्या समस्यांचा अभ्यास करताना स्थानिक नागरिकांचे अनुभव, प्रत्यक्ष क्षेत्रीय निरीक्षणे, उपलब्ध शासकीय माहिती आणि संशोधनाच्या निष्कर्षांचा एकत्रित वापर करण्यावर भर देण्यात आला. नदीच्या विविध भागांची नियमित क्षेत्रभेट घेऊन सद्यस्थितीचे दस्तऐवजीकरण करण्याचे नियोजन करण्यात आले. नदीच्या प्रवाहातील विविध टप्पे, शहरातून जाणारा नदीभाग आणि नदीकाठावरील मानवी वस्ती यांचा स्थानिक पातळीवर अभ्यास करण्यात येणार आहे.
क्षेत्रीय कामादरम्यान नदीपात्रातील कचऱ्याचे स्वरूप, सांडपाण्याचे संभाव्य स्रोत, प्रदूषणाची ठिकाणे, नदीकाठची वनस्पती व जैवविविधता, अतिक्रमणे, नदीकाठावरील मानवी क्रिया, सार्वजनिक वापराची ठिकाणे आणि इतर पर्यावरणीय समस्यांची नोंद केली जाणार आहे. या माहितीचे छायाचित्रण, GPS आधारित स्थाननिश्चिती, नकाशीकरण आणि GIS तंत्रज्ञानाच्या माध्यमातून विश्लेषण करण्याची संकल्पना बैठकीत मांडण्यात आली.
नदी संवर्धनासाठी प्रथम नदीची सद्यस्थिती, तिच्या समस्या आणि त्या समस्यांची भौगोलिक व्याप्ती समजून घेणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी अधोरेखित केले. कोणत्या भागात कोणती समस्या अधिक तीव्र आहे, त्यामागील संभाव्य कारणे कोणती आहेत आणि त्यावर स्थानिक पातळीवर कोणत्या उपाययोजना करता येऊ शकतात, याचा अभ्यास करण्यावर भर देण्यात येणार आहे.
(Mula Mutha River Conservation) भविष्यात नदीस्थिती नोंदवही, क्षेत्रीय छायाचित्र संग्रह, समस्या नकाशे, नागरिकांच्या सूचना आणि स्थानिक निरीक्षणांचा डिजिटल डेटाबेस तयार करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. या माध्यमातून संकलित होणारी माहिती पुढील संशोधन, जनजागृती, क्षेत्रीय नियोजन आणि प्रशासनासोबतच्या संवादासाठी उपयोगात आणली जाणार आहे. नदी संवर्धन हे केवळ शासन किंवा एखाद्या संस्थेचे काम नसून नदीशी प्रत्यक्ष संबंध असलेल्या नागरिकांचीही सामूहिक जबाबदारी आहे, यावर बैठकीत विशेष भर देण्यात आला. नदीकाठच्या परिसरातील नागरिक, विद्यार्थी, महाविद्यालयीन युवक, सामाजिक संस्था, पर्यावरण अभ्यासक, संशोधक आणि विविध क्षेत्रांतील तज्ज्ञांना या उपक्रमाशी जोडण्याचे नियोजन करण्यात आले.
Citizen Participation आणि Citizen Science या संकल्पनांच्या माध्यमातून सामान्य नागरिकांनाही नदीच्या निरीक्षण आणि संवर्धन प्रक्रियेत सहभागी करून घेण्याचा विचार पुढे आला. नागरिकांकडून नदी परिसरातील समस्या, बदल, प्रदूषणाची ठिकाणे आणि स्थानिक अनुभव यांची माहिती संकलित करून तिची शास्त्रीय पद्धतीने नोंद करण्यावर भर दिला जाणार आहे.
मुळा-मुठा नदी संवर्धनाच्या चळवळीत युवकांनी पुढाकार घेणे आवश्यक असल्याचेही बैठकीत स्पष्ट करण्यात आले. सोशल मीडिया, डिजिटल मॅपिंग, फोटोग्राफी, व्हिडिओ दस्तऐवजीकरण, डेटा संकलन आणि जनजागृतीच्या माध्यमातून युवक प्रभावी भूमिका बजावू शकतात. नदीशी संबंधित समस्या समाजासमोर तथ्यात्मक आणि जबाबदार पद्धतीने मांडण्यासाठी डिजिटल माध्यमांचा वापर करण्यावरही चर्चा झाली.
नदीकाठावरील स्वच्छता, वृक्षसंवर्धन, जनजागृती, विद्यार्थ्यांसाठी क्षेत्रीय अभ्यास, स्थानिक नागरिकांशी संवाद आणि विविध सामाजिक उपक्रमांना चालना देण्याचे नियोजन करण्यात आले. फक्त कचरा उचलणे म्हणजे नदी संवर्धन नव्हे, अशी व्यापक भूमिका यावेळी मांडण्यात आली. नदीमध्ये कचरा पुन्हा जाऊ नये यासाठी त्याची कारणे व स्रोत शोधणे, सांडपाण्याचे प्रश्न समजून घेणे, नदीकाठच्या पर्यावरणीय स्थितीचा अभ्यास करणे आणि नागरिकांच्या वर्तनात सकारात्मक बदल घडवून आणणे आवश्यक असल्याचे उपस्थितांनी सांगितले.
नदी संवर्धनाच्या उपक्रमाची माहिती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी समितीच्याअधिकृत Instagram पेज `@mula_mutha_army` चे अनावरण यावेळी करण्यात आले. या माध्यमातून समितीच्या क्षेत्रीय कामाची माहिती, नदी परिसरातील समस्या, स्वच्छता व संवर्धन उपक्रम, क्षेत्रीय छायाचित्रे, जनजागृतीपर माहिती आणि नागरिकांच्या सहभागासाठी आवश्यक आवाहने सातत्याने प्रसारित करण्याचे नियोजन करण्यात आले आहे. डिजिटल माध्यमांचा वापर केवळ प्रचारासाठी न करता नागरिकांकडून नदीशी संबंधित माहिती, छायाचित्रे, स्थानिक समस्या आणि सूचना प्राप्त करण्यासाठीही करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला. त्यामुळे प्रत्यक्ष क्षेत्रीय काम आणि डिजिटल नागरिक सहभाग यांचा समन्वय साधण्याचा प्रयत्न समितीच्या माध्यमातून केला जाणार आहे.
आगामी काळात समितीच्या माध्यमातून नदीच्या विविध भागांची क्षेत्रभेट, समस्यांचे दस्तऐवजीकरण, प्रदूषणाच्या संभाव्य स्रोतांचे मॅपिंग, नागरिकांशी संवाद, नदीकाठ स्वच्छता उपक्रम, विद्यार्थ्यांचा सहभाग, तज्ज्ञांचे मार्गदर्शन आणि संबंधित शासकीय यंत्रणांशी समन्वय साधण्याचे नियोजन करण्यात आले. संकलित माहितीच्या आधारे नदीच्या विविध भागांतील समस्यांचे प्राधान्यक्रम निश्चित करून स्थानिक पातळीवरील कृती आराखडा तयार केला जाणार आहे. (Mula Mutha River Conservation) भविष्यात या माहितीचा उपयोग संशोधन, जनजागृती, धोरणात्मक सूचना आणि प्रशासनासोबतच्या संवादासाठी करण्याचा प्रयत्न राहणार आहे. मुळा-मुठा संवर्धन समितीच्या माध्यमातून नदीशी संबंधित विविध क्षेत्रांतील व्यक्तींना एकत्र आणून संशोधनातून समस्या ओळखणे, लोकसहभागातून उपाय शोधणे आणि प्रत्यक्ष क्षेत्रीय कृतीतून बदल घडविणे’ या दिशेने काम करण्याचा निर्धार करण्यात आला.
या बैठकीस प्रा. क्षितिज बैरागी, प्रा. अंबादास मेव्हणकर, क्षुधांत पाटील, गणेश सोलाट, शिवा बारोळे, ॲड. प्रभाकर पाटील, ॲड. श्रीकांत कोंडे, नवनाथ कावळे, दिनेश महाजन, संजय बनकर, विरेश स्वामी, महेश नरहरे आदी उपस्थित होते. घटस्थापनेच्या शुभमुहूर्तावर घेतलेला हा संकल्प केवळ एका दिवसाच्या स्वच्छता उपक्रमापुरता मर्यादित न ठेवता मुळा-मुठा नदीच्या दीर्घकालीन संवर्धनासाठी सातत्यपूर्ण सामाजिक, संशोधनाधारित आणि क्षेत्रीय चळवळ उभारण्याचा आहे. नदीकडे केवळ जलस्रोत म्हणून न पाहता तिचे पर्यावरणीय, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्व समजून घेऊन तिच्या संवर्धनासाठी सामूहिक प्रयत्न करण्याची गरज यावेळी व्यक्त करण्यात आली.
मुळा-मुठा नदीचे संवर्धन हे एका समितीचे किंवा काही व्यक्तींचे काम नसून संपूर्ण समाजाची सामूहिक जबाबदारी आहे. शास्त्रीय माहिती, स्थानिक अनुभव, युवकांची ऊर्जा, नागरिकांचा सहभाग आणि सातत्यपूर्ण क्षेत्रीय कृती यांच्या माध्यमातून नदीच्या संवर्धनासाठी एक सक्षम लोकचळवळ उभी करण्याचा समितीचा प्रयत्न राहणार आहे. आजचा संकल्प ही त्या दीर्घ प्रवासाची सुरुवात असून, पुढील पिढ्यांना अधिक स्वच्छ, सुरक्षित आणि पर्यावरणीयदृष्ट्या सक्षम मुळा-मुठा नदी देण्यासाठी सातत्याने कार्य करण्याचा निर्धार यावेळी करण्यात आला. पंचाळेश्वरच्या साक्षीने मुठा नदीच्या स्वच्छ पाण्याने एक दिवस पांचाळेश्वरचा अभिषेक समितीचे सदस्य करतील असा आशावाद यावेळी व्यक्त केला गेला.























