उद्योजक राणा सूर्यवंशी हल्ला प्रकरणाला नवे वळण
marathinews24.com
पुणे – Rana Suryawanshi Attack Case : उद्योजक आणि राणा शिपिंग कॉर्पोरेशनचे मालक राणा सूर्यवंशी यांच्यावरील हल्ला प्रकरणात धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. त्यांना संपवण्यासाठी जवळच्या मित्रांनीच मारेकऱ्यांना सुपारी दिली असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. हल्ला झाल्यानंतर त्यांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यासाठी आणि तेथून पुढेही त्यांच्यासोबत हेच मित्र पुढे असल्याचे स्पष्ट झाले आहे. विशाल धुमाळ, सागर पवार आणि रोहित तुपे अशी तिघांची नावे आहेत. त्यांचा शोध पोलिसांकडून घेतला जात आहे. याप्रकरणी बारामती तालुका पोलिसांनी यापूर्वी दोघांना अटक केली आहे.
वाघोली पोलिसांनी चेहर्यावर फुलवले हसू – सविस्तर बातमी
पार्थ वासुदेव अवस्थळे (वय १९ रा. पिंपरी गवरी, खामगाव, बुलढाणा, सध्या- कर्वेनगर, पुणे) आणि ज्ञानदेव महादेव शिंदे (वय ५०, रा. वीट, करमाळा, सोलापूर, सध्या-थोरातनगर, भिगवण) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. राणा दिलीप सूर्यवंशी (वय ४१ रा. मगरपट्टा, हडपसर) असे गंभीर जखमी झालेल्या उद्योगपतीचे नाव आहे. त्यांच्यावर पुण्यातील खासगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. लक्ष्मीकांत महादेव सूर्यवंशी यांनी बारामती तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उद्योजक राणा सूर्यवंशी यांच्या तीन मित्रांनी दौंड जवळील एका ढाब्यावर भेटून हल्लेखोरांना २ लाख रुपयांची सुपारी दिली होती. त्यावेळी ‘डिफेंडर’ गाडीतून हे तीन मित्र फिरत होते, तीच गाडी हल्ल्याच्या दिवशी राणा यांच्या आसपास होती. जखमी झालेल्या राणा यांना सुरुवातीला बारामतीच्या रुग्णालयात हलवण्यात आले होते. त्यावेळी तिन्ही मित्रांच्या संशयास्पद हालचालींमुळे बारामती पोलिसांना संशय बळावला होता. सीसीटीव्ही फुटेज नुसार त्यांचा या प्रकरणात सहभाग असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यानुसार तिन्ही आरोपींच्या शोधार्थ पोलीस पथक रवाना केले आहे. दरम्यान, सोशल मीडियावर या तिघांचे राणा यांच्यासोबत फोटो आणि व्हिडिओ आहेत. त्यांनी हल्ल्याची सुपारी का दिली, ते हल्लेखोरांना का भेटले, एकच गाडी अनेक ठिकाणी कशी काय आढळून आली, असे अनेक प्रश्न त्यांना ताब्यात घेतल्यावर उघड होणार आहेत.
दरम्यान तीन मित्र पुण्यातील रुग्णालयातही राणा यांच्यासोबत हजर होते. पोलिसांनी आतापर्यंत राणा यांचा वाहनचालक ज्ञानेश्वर शिंदे, हल्लेखोर पार्थ अवस्थळे यांना अटक केली आहे. आरोपी शिंदे यानेच हल्लेखोरांना २ लाख रुपये दिले. त्यानंतर सुपारी १७ वर्षीय अल्पवयीन मुलासह दोघांना देण्यात आली होती. तर आरोपी निनाद महाडिक याने या हल्ल्यासाठी आपली दुचाकी उपलब्ध करून दिली होती. सध्या हे सर्व आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
वाय सुरक्षा १० किलोमीटर आधीच सोडली
उद्योजक राणा सूर्यवंशी यांना शासनाने ‘वाय’ दर्जाची सुरक्षा दिली आहे. मात्र, १८ ऑक्टोबरला हल्ल्याच्या दिवशी त्यांनी सुरक्षा रक्षकांना १० किलोमीटर आधीच थांबवले होते. मला जमिनीची पाहणी करायची आहे, एका व्यवहाराबाबत चर्चा करायची आहे, असे त्यांनी सुरक्षा रक्षकांना सांगितले. त्यांच्यासोबत एक पोलीस अंमलदार हजर होता. हल्ला झाल्यानंतर पोलिसाने आरोपीला पकडले होते. मात्र, संबंधित हल्लेखोर पोलिसाच्या हाताला चावा घेऊन पळ काढल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे.
आम्ही तुमचे फॅन आहोत” म्हणत आले जवळ अन केला हल्ला
राणा सूर्यवंशी हे १८ ऑक्टोबरला बारामती विमानतळाजवळ जमीन पाहण्यासाठी गेले होते. त्यावेळी हल्लेखोर पार्थ अवस्थळे आणि अल्पवयीन मुलाने आम्ही तुमचे फॅन आहोत, तुमच्या सोबत फोटो काढायचा आहे असे म्हणत ते राणा यांच्याजवळ गेले. त्यानंतर सत्तूराने त्यांच्या हातावर वार केले. त्यानंतर हल्लेखोर पसार झाले होते. त्यांना अटक करण्यात आली आहे. दरम्यान, राणा यांच्यावर झालेला हल्ला कशामुळे झाला, यामागे आणखी कोणी आहे का याचा तपास पोलीस करत आहेत.























