चित्रपट महोत्सवात तीन पुरस्कार पटकावले
marathinews24.com
बीड (अनंत जाधव) – मराठवाड्याची पार्श्वभूमी आणि विनोदी मनोरंजनाची मेजवानी असलेला ‘गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी’ (Marathi Movie 2026) हा मराठी चित्रपट शुक्रवारी दि. २३ ऑक्टोबरला संपूर्ण राज्यभरात प्रदर्शित झाला. या चित्रपटाने कलानगरी कोल्हापूर आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (KKIFF) तीन पुरस्कार पटकावले आहेत. चित्रपटाला महोत्सवात उत्कृष्ट सामाजिक चित्रपट, उत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण) आणि उत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) असे तीन पुरस्कार मिळाले आहेत.
उत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण) हा पुरस्कार भावना काळे यांना मिळाला आहे. या पुरस्कारांमुळे चित्रपटाच्या सामाजिक आशयाची तसेच दिग्दर्शन आणि अभिनयातील कामगिरीची दखल घेण्यात आली आहे. चित्रपटाचे दिग्दर्शन सिद्धार्थ सोनवणे यांनी केले असून, निर्मिती ऍड. शुभांगी मोरे पाटील यांनी केली आहे. चित्रपटात धम्मानंद, भावना काळे, विष्णू भारती, सिद्धार्थ सोनवणे, प्रदीप निकाळजे, सचिन चव्हाण, बाळासाहेब ढमाले, आशा शेरखाने, अनिता सातदिवे, अनंत देवकते, अशोक कुलकर्णी, राजेंद्र पौळ, शंभुराजे विश्वासु आदी कलाकारांच्या भूमिका आहेत. चित्रपटासाठी सिध्दार्थ सोनवणे यांनी गाणी लिहिली असून बेला शेंडे, स्वप्निल बांदोडकर, कविता राम यांनी ती गायली आहेत.
सुनीत बोरगांवकर यांचे संगीत चित्रपटाला लाभले आहे. मराठवाड्याची पार्श्वभूमी, गावाकडील जीवनाशी जोडलेले नातेसंबंध आणि विनोदी मनोरंजन यांची सांगड घालणारा हा चित्रपट प्रेक्षकांसाठी सादर होत आहे. चित्रपटाच्या नावातूनच गाव, गावकी आणि भावकी यांच्याशी संबंधित नात्यांचे महत्त्व अधोरेखित होते. पुरस्कारांची मोहोर उमटवलेला हा चित्रपट आता मोठ्या पडद्यावर पाहण्याची संधी प्रेक्षकांना मिळणार आहे. मराठी चित्रपटप्रेमींनी ‘गांव तिथं गावकी भाव तिथं भावकी’ या चित्रपटाला आपल्या जवळच्या चित्रपटगृहात जाऊन प्रतिसाद द्यावा, असे आवाहन चित्रपटाच्या निर्मात्या ॲड शुभागी मोरे पाटील, दिग्दर्शक सिध्दार्थ सोनवणे, प्रसिद्ध प्रमुख अनंत जाधव यांच्यासह चित्रपटाच्या सर्व टीमने केले आहे.























