एस. एम. जोशी पुलाजवळील घटना; दोघांना अटक
marathinews24.com
पुणे – गुंतवणुकीसाठी दिलेले पैसे वारंवार परत मागितल्याच्या रागातून दोघांनी चार अनोळखी तरुणांच्या मदतीने एका २३ वर्षीय तरुणावर लोखंडी हत्याराने वार करून खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना एस. एम. जोशी पुलाजवळील स्मशानभूमी परिसरात घडली. या प्रकरणी विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, दोघांना अटक करण्यात आली आहे. शुभम बसवराज म्हेत्रे (वय २३, रा. विश्वरत्न बुद्धविहाराजवळ, प्रेमनगर वसाहत, मार्केट यार्ड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्याने दिलेल्या तक्रारीनुसार, आरोपी हर्षल मितेश फुलपगार आणि मितेश फुलपगार (वय अंदाजे ५०, दोघेही रा. लोकमान्यनगर) यांच्याकडे त्याने गुंतवणुकीसाठी पैसे दिले होते. हे पैसे वारंवार परत मागितल्याचा राग आरोपींच्या मनात होता.
जय भवानी सहकारी बँकेत साडेचार कोटींचा कर्ज घोटाळा – सविस्तर बातमी
आरोपींनी शुभम याला बोलावून घेतले. त्यानंतर चार अनोळखी तरुणांना त्याच्यावर हल्ला करण्यासाठी पाठवले. या तरुणांनी लोखंडी हत्याराने शुभम याच्या डोक्यावर आणि दोन्ही हातांवर वार केले. त्याला जिवे मारण्याच्या उद्देशाने हा हल्ला करण्यात आल्याचे तक्रारीत नमूद आहे. २३ नोव्हेंबर रोजी रात्री सातच्या सुमारास ही घटना घडली. याप्रकरणी २४ नोव्हेंबर रोजी पहाटे विश्रामबाग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.






















