हिट अँड रन प्रकरणात कारवाई, काळेपडळ पोलिसांनी आरोपीला घेतले ताब्यात
marathinews24
पुणे – मॉर्निंग वॉक करणार्याला धडक देउन पसार झालेल्या मोटार चालकाला काळेपडळ पोलिसांनी अवघ्या १० तासात बेड्या ठोकल्या आहेत. त्याने १ एप्रिलला सकाळी साडेसहाच्या सुमारास व्यायाम करणार्याला धडक दिल्याने एका व्यक्तीचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजनुसार मोटारीचा क्रमांक प्राप्त करीत चालकाला अटक केली आहे. समीर गणेश कड ( रा. कडनगर, होलेवस्ती चौक, उंड्री) असे अटक केलेल्या चालकाचे नाव आहे. सुजितकुमार बसवंतप्रसाद सिंग (वय ४९ रा. बी/५, विद्यानिकेतन, हांडेवाडी रोड, उंड्री) असे ठार झालेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सुजितकुमार हे उंड्री परिसरात राहायला असून, ते नेहमीप्रमाणे १ एप्रिलला सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास न्याती ईबोनी सोसायटीजवळ मॉर्निंक वॉक करीत होते. त्यावेळी भरधाव वेगाने मोटार चालवित आलेल्या समीर कड याने त्यांना पाठीमागून धडक दिली. त्यानंतर त्यांना मदत न करता आरोपी चालक पसार झाला होता. अपघातात सुजितकुमार यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस नियंत्रण कक्षातून माहिती मिळाल्यानंतर काळेपडळ पोलिसांनी तातडीने धाव घेउन जखमीला रूग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारापुर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. त्यानंतर काळेपडळ पोलिसांनी दोन टीमकडून आरोपीचा माग काढण्यास प्राधान्य दिले.
घटनास्थळाच्या आजुबाजुचे सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली असता, परिसरातून मोटार जाताना दिसून आली. पोलिसांनी आरटीओकडून मागील दोन महिन्यात नवीन रजिस्टर झालेल्या टाटा कंपनीच्या वाहनांची माहिती मिळविली. वाहन क्रमांकाचे तांत्रीक विश्लेषणाद्वारे पुन्हा उंड्री, महंमदवाडी, हांडेवाडीतील सीसीटीव्ही फुटेज तपासले. पोलीस अंमलदार शाहिद शेख , अतुल पंधरकर यांनी केलेल्या विश्लेषणावरून अपघात केलेल्या ( एमएच १२ एक्सएच ५४३४) चालकाचा माग काढून अवघ्या १० तासात आरोपी गाडी मालकाला अटक केली. पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, एपीआय अमित शेटे, प्रविण काळभोर, युवराज दुधाळ, प्रविण कांबळे, परशुराम पिसे, शाहिद शेख, अतुल पंधरकर, श्रीकृष्ण खोकले, नितीन शिंदे, महादेव शिंदे, सद्दाम तांबोळी, आशिष गरुड, राहित पाटील यांनी ही कामगिरी केली.