महाराष्ट्रीय कलोपासक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा इतिहास पुस्तकरूपात
marathinews24.com
पुणे – ‘कलोपासकांचे आख्यान’चे शनिवारी प्रकाशन – महाराष्ट्रीय कलोपासक आणि पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा इतिहास पुस्तकरूपात नाट्यरसिकांच्या हाती येणार आहे. ‘कलोपासकांचे आख्यान’ असे या पुस्तकाला नाव देण्यात आले असून पुस्तकाचे प्रकाशन येत्या शनिवारी (दि. 9 ऑगस्ट) ज्येष्ठ अभिनेत्री सुहास जोशी यांच्या हस्ते होणार आहे.
महाराष्ट्रीय कलोपासक संस्थेने आज (दि. 3 ऑगस्ट) 90व्या वर्षात पदार्पण केले. त्यानिमित्त शनिवार पेठेतील नातूवाडा येथे पदाधिकारी आणि हितचिंतकांच्या उपस्थितीत नटराज पूजन करण्यात आले. त्या वेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. कलोपासकचे उपाध्यक्ष डॉ. सुहास जोशी, चिटणीस ॲड. राजेंद्र ठाकूरदेसाई, खजिनदार सुहास नांगरे आदी उपस्थित होते. स्पर्धेच्या प्राथमिक फेरीचे परीक्षक शेखर भागवत, राजेश कोलन, धनेश जोशी तर अंतिम फेरीचे परीक्षक अश्विनी गीरी, प्रदीप वैद्य, योगेश सोमण आहेत.
पुस्तक प्रकाशन सोहळा शनिवार, दि. 9 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 6:30 वाजता भरत नाट्य मंदिर येथे आयोजित करण्यात आला असून या प्रसंगी महाराष्ट्रीय कलोपासकचे चिटणीस राजेंद्र ठाकूरदेसाई यांच्या मुलाखातीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
पुस्तकाची विभागणी पाच विभागात करण्यात आली आहे. पहिल्या विभागात कलोपासकची 9 दशके, दुसऱ्या विभागात कलोपासकच्या दोन विशेष उपक्रमांची माहिती देण्यात आली आहे. तिसऱ्या विभागात पुरुषोत्तम करंडक स्पर्धेचा 60 वर्षांचा इतिहास विस्तृतपणे मांडण्यात आला आहे. चौथ्या विभागात भालबा केळकर नाटिका स्पर्धा आणि राजा नातू करंडक स्पर्धेची माहिती देण्यात आली आहे. परिशिष्ट या पाचव्या विभागात 60 वर्षातील स्पर्धेचे परीक्षक, पारितोषिकप्राप्त एकांकिका, विजेत्यांची नावे याचा समावेश आहे. रंगभूमीच्या ज्येष्ठ अभ्यासक श्यामला वनारसे यांनी पुस्तकासाठी प्रस्तावना लिहिली आहे.
स्पर्धेसाठी 51 संघांची निश्चिती; सोमवारी लॉटस्
पुरुषोत्तम करंडक स्पर्धेसाठी आज (दि. 3 ऑगस्ट) नातूवाडा येथे स्पर्धक विद्यार्थ्यांकडून अर्ज स्वीकारण्यात आले आहेत. स्पर्धेत सहभागी झालेल्या संघांचे लॉटस् सोमवारी (दि. 4 ऑगस्ट) दुपारी 4 वाजता सुदर्शन रंगमंच, शनिवार पेठ येथे स्पर्धकांच्या उपस्थितीत काढण्यात येणार आहेत. स्पर्धेची प्राथमिक फेरी दि. 10 ऑगस्ट ते 24 ऑगस्ट 2025 या कालावधीत भरत नाट्य मंदिरात होणार आहे.























