आयपीएस महिला अधिकाऱ्याला खडसावले, उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केली भूमिका
marathinews24.com
पुणे – गौण खनिज तस्करांविरुद्ध कारवाई करत असलेल्या सोलापूर जिल्ह्यातील महिला आयपीएस पोलीस अधिकाऱ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी खडसावले होते. आपल्या कार्यकर्त्यांवर होत असलेल्या कारवाईमुळे त्यांनी थेट संबंधित महिला अधिकाऱ्याला फोन करून इतना डेअरिंग, मै डेप्युटी चीफ मिनिस्टर हु, डायरेक्ट ऍक्शन लुंगा असे म्हटले होते. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वक्तव्याविषयी अनेकांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याचपार्श्वभूमीवर आता पवारांनी सोशल मीडियावर आपली प्रतिक्रिया देत बाजू सावरण्याचा प्रयत्न केला आहे.
पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांनी घेतला विसर्जन सोहळा बंदोबस्ताचा आढावा – सविस्तर बातमी
सोलापूर जिल्ह्यातील पोलीस अधिकाऱ्यांसोबत झालेल्या संवादाचे काही व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाले आहेत. या संदर्भात संबंधितांनी स्पष्ट केले आहे की, त्यांच्या कृतीमागे कायद्याच्या अंमलबजावणीत हस्तक्षेप करण्याचा कोणताही उद्देश नव्हता. उलट परिस्थिती शांत राहावी आणि तणाव वाढू नये, यासाठी त्यांनी प्रयत्न केले होते.
अजित पवार पुढे म्हणाले, “माझा पोलीस दलाबद्दल सर्वोच्च आदर आहे. धैर्यानं आणि प्रामाणिकपणे कर्तव्य बजावणाऱ्या महिला अधिकारी व कर्मचारी यांच्याबद्दलही मला अपार सन्मान आहे. माझ्यासाठी कायद्याचं राज्य हेच सर्वात महत्त्वाचं आहे. तसेच त्यांनी पारदर्शक प्रशासकीय कारभारासाठी आपली वचनबद्धता व्यक्त केली. “बेकायदेशीर वाळू, माती, खडक उपशा तसेच प्रत्येक बेकायदेशीर कृतीवर कायद्याप्रमाणे कठोर कारवाई केली जाईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.






















