तब्बल साडेतीन कोटींचे अमली पदार्थ जप्त – पुणे मुंबई, पिंपरीसह गाेव्यात कारवाई; ५ जण अटकेत
marathinews24.com
पुणे – शहरात नववर्षाच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी अमली पदार्थ विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली. पिंपरी भागात सदनिकेवर छापा टाकून तेथून हायड्रोपोनिक गांजा जप्त करण्यात आला. फ्लॅटमध्ये हायड्रोपोनिक गांजाची लागवड केल्याचा प्रकार उघडकीस आला. याप्रकरणात अटक केलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीनंतर पुणे पोलिसांच्या पथकाने पुणे, पिंपरीसह मुंबई, गोव्यात कारवाई केली. या कारवाईत पोलिसांनी मेफेड्रोन, ओझीकुश (हायड्रोपोनिक गांजा), चरस, एलएसडीसह वेगवेगळ्या प्रकारचे अमली पदार्थ जप्त केले. जप्त केलेल्या अमली पदार्थांंची किंमत साडेतीन कोटी रुपये आहे.
पुण्यातील कुख्यात आंदेकर टोळीला पोलिसांचा दणका – सविस्तर बातमी
तुषार चेतन वर्मा (वय २१, सध्या रा. शितळादेवीनगर, सूस, मूळ रा. दिल्ली), सुमीत संतोष डेडवाल (वय २५, सध्या रा. मधुबन काॅलनी, सांगवी, मूळ रा. शिक्षक काॅलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), अक्षय सुखलाल महेर (वय २५, सध्या रा. एक्सर्बिया टाऊनशिप, हिंजवडी, मूळ रा. प्रगती काॅलनी, गंगापूर, छत्रपती संभाजीनगर), मलय राजेश डेलीवाला (वय २८, रा. अमृतनगर, घाटकोपर, मुंबई), स्वराज अनंत भोसले (वय २८, रा. खोत चाळ, कुर्ला, मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. अमली पदार्थांची तस्करी, तसेच महाविद्यालयीन तरुणांंना अमली पदार्थ विक्री करणाऱ्या सराइतांविरुद्ध पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी कडक कारवाईचे आदेश दिले आहेत.
आरोपी तुषार वर्मा अमली पदार्थ विक्री करत असल्याची माहिती तपास पथकाला मिळाली हाेती. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने खडकी परिसरात सापळा लावून त्याला पकडले. वर्माची चौकशी करण्यात आली. तेव्हा त्याचे साथीदार सुमीत डेडवाल, अक्षय महेर हे पिंपरी भागात वास्तव्यास असून, तेथे त्यांनी सदनिका भाडेतत्वावर घेतल्याची माहिती तपासात मिळाली. वर्मा, डेडवाल, महेर यांनी सदनिकेत हायड्रोपोनिक गांजाची लागडव केल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस उपायुक्त सोमय मुुंडे यांच्या मार्गदर्शानाखाली पोलिसांच्या पथकाने पिंपरीत छापा टाकला. तेथून हायड्रापोनिक गांजा, तसेच अन्य साहित्य जप्त केले.
अमली पदार्थ विक्री, तस्करी प्रकरणात वर्मा, डेडवाल, महेर यांची चौकशी करण्यात आली. तेव्हा या प्रकरणातील मुख्य तस्कर मलय डेलीवालाची माहिती मिळाली.
पोलिसांच्या पथकाने डेलीवाला, भोसले यांना मुंबईतून ताब्यात घेतले. तपासाात मिळालेल्या माहितीनंतर पोलिसांनी गोव्यात छापे टाकले. या कारवाईत पोलिसांनी ३ कोटी ४५लाख रुपयांचे अमली पदार्थ जप्त केले. पोलीस आयुक्त अमितेश कुमार, सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, उपायुक्त सोमय मुंडे, सहायक आयुक्त विठ्ठल दबडे, खडकी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रमसिंह कदम, गुन्हे शाखेचे निरीक्षक किरण गायकवाड, उपनिरीक्षक दिग्विजय चौगले, बाणेर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक चंद्रशेखर सावंत, पोलीस कर्मचारी भोरे, अमली पदार्थ विरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक सुदर्शन गायकवाड, पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, खंडणी विरोधी पथकाच्या पोलीस निरीक्षक वर्षा देशमुख, सहायक पोलीस निरीक्षक नितीनकुमार नाईक, जाधव, दिनेश भारकड, उपनिरीक्षक वैभव पाटील, विराज शिंदे (सहारा पोलीस ठाणे, मुंबई) यांनी ही कारवाई केली.
आरोपींच्या खात्यातील रोकड गाेठविली
अटक करण्यात आलेल्या आरोपींच्या खात्यातील ७ लाख ८० हजार रुपयांची रक्कम गोठविण्यात आली आहे. आरोपींना पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अमली पदार्थ तस्करीचे आंतराष्ट्रीय जाळे असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्यादृष्टीने तपास करण्यात येत आहे.




















