‘मिस फोटोजेनिक’ आणि ‘मिस फिटनेस’ हे दोन मानाचे किताबही पटकावले
marathinews24.com
पुणे – Anushka Bansode Miss Earth India 2026 : पुण्याची कन्या अनुष्का बनसोडे हिने जयपूर येथे डिवाईन ग्रुप यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या प्रतिष्ठित ‘मिस अर्थ इंडिया’ सौंदर्यस्पर्धेत ‘मिस अर्थ इंडिया एअर २०२६’ हा मानाचा किताब पटकावून पुण्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. यासोबतच तिने ‘मिस फोटोजेनिक’ आणि ‘मिस फिटनेस’ हे दोन महत्त्वाचे किताबही जिंकले. तिच्या या उल्लेखनीय यशामुळे पुण्याच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
अनुष्काचे हे यश तिची मेहनत, शिस्त, आत्मविश्वास, जिद्द आणि सातत्यपूर्ण प्रयत्न यांचे फलित आहे. वयाच्या सोळाव्या वर्षापासून मॉडेलिंग क्षेत्रात पदार्पण केलेल्या अनुष्काने आपल्या प्रतिभेच्या जोरावर फॅशन आणि ई-कॉमर्स क्षेत्रातील नामांकित ब्रँड्ससोबत काम केले आहे. विविध फॅशन व्यासपीठांवर आपली ओळख निर्माण करत तिने आपल्या स्वप्नांच्या दिशेने आत्मविश्वासाने वाटचाल केली आहे.
केवळ सौंदर्य आणि फॅशनपुरते मर्यादित न राहता, पर्यावरण संवर्धन आणि शाश्वत विकासाबाबत तरुण पिढीमध्ये जागरूकता निर्माण करण्याचे ध्येयही अनुष्का बाळगते. लहान मुलांपासून तरुणांपर्यंत पर्यावरणाप्रती जबाबदारीची भावना रुजवून हरित आणि सुंदर भविष्य घडविण्यासाठी योगदान देण्याची तिची इच्छा आहे. Anushka Bansode Miss Earth India 2026 राष्ट्रीय स्तरावरील या प्रतिष्ठित स्पर्धेत तीन मानाचे किताब मिळवणे ही अनुष्कासाठी अभिमानाची बाब असून, तिचे हे यश पुणे शहरासाठीही गौरवास्पद आहे. महत्त्वाकांक्षा, आत्मविश्वास आणि समाजाप्रती असलेली बांधिलकी यांचा सुंदर संगम तिच्या प्रवासातून दिसून येतो.
‘मिस अर्थ इंडिया एअर २०२६’, ‘मिस फोटोजेनिक’ आणि ‘मिस फिटनेस’ या तीन किताबांची मानकरी ठरलेली अनुष्का बनसोडे हिने आपल्या कर्तृत्वाने पुण्याचा नावलौकिक वाढवला आहे. तिच्या या यशामुळे तिच्या पुढील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय वाटचालीसाठी नवी दालने खुली झाली आहेत.





















