बारामतीतील प्रलंबित महसुली प्रकरणांसाठी ३ डिसेंबरला लोकअदालत
marathinews24.com
बारामती – Baramati Revenue Lok Adalat 2026 : प्रलंबित महसुली प्रकरणांचा कमी कालावधीत निपटारा होऊन पक्षकारांचा वेळ व पैशांची बचत तसेच अर्धन्यायिक यंत्रणेवरील कामाचा ताण कमी करण्याच्या उद्देशाने महात्मा फुले महसूल लोकअदालत अभियानांतर्गत बारामती तालुक्यात ३ डिसेंबर २०२६ रोजी होणाऱ्या महसूल लोक अदालती मध्ये सहभागी होण्यासाठी विहित नमुन्यातील संयुक्त अर्ज व आवश्यक कागदपत्रे ३० नोव्हेंबर २०२६ पर्यंत तहसील कार्यालय, बारामती येथे सादर करावेत असे आवाहन तहसीलदार स्वप्निल रावडे यांनी केले आहे.
औंध-बोपोडी परिसरात पाच ठिकाणी सार्वजनिक वसुबारस पूजनाचे आयोजन – सविस्तर बातमी
महसूल विभागाकडे जमिनीशी संबंधित अनेक महसुली दावे दाखल असतात. विविध कारणांमुळे ही प्रकरणे दीर्घकाळ प्रलंबित राहतात. तसेच एका स्तरावर निर्णय झाल्यानंतर असमाधानी पक्षकारांकडून वरिष्ठ न्यायालयात अपील अथवा पुनरीक्षण अर्ज दाखल केले जातात. त्यामुळे प्रकरणे वर्षानुवर्षे सुरू राहून संबंधित पक्षकारांचा वेळ आणि पैसा खर्च होतो.
या पार्श्वभूमीवर विधी सेवा प्राधिकरणाच्या लोक अदालतीच्या धर्तीवर दोन्ही पक्षकारांच्या सहमतीने व तडजोडीने महसुली दावे कायमस्वरूपी निकाली काढण्याची संधी या महात्मा जोतीराव फुले महसूल लोकअदालत अभियानातून उपलब्ध करून देण्यात आली आहे.
बारामती तालुक्यातील सर्व संबंधित पक्षकारांना व त्यांच्या वकिलांना या उपक्रमाची माहिती देण्यात येत असून. लोकअदालतीच्या माध्यमातून तडजोड करू इच्छिणाऱ्या पक्षकारांनी दोन्ही पक्षकारांची संयुक्त संमती अथवा आवश्यकतेनुसार त्यांच्या वकिलांमार्फत प्राप्त अर्जांची छाननी करून संबंधित दावे निकाली काढण्यासाठी ३ डिसेंबर रोजी महसूल लोक अदालतीमध्ये बोलाविण्यात येणार आहेत.




















