मद्याच्या बाटल्यांसह मोटार जप्त
marathinews24.com
पुणे – शहरातील ऊरळी देवाची नगरपरिषदेच्या निवडणुकची तयारी सुरू असताना हडपसरमधील फुरसुंगी भागात भारतीय जनता पक्षाच्या उमेदवाराच्या मुलासह दोघांना मद्य वाहतूक करताना पकडण्यात आले. याप्रकरणी दोघांविरुद्ध फुरसुंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. निवडणूक आयोगाच्या पथकाने सोमवारी रात्री ही कारवाई केली. कारवाईत मद्याच्या बाटल्यासह मोटार असा ७ लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
सोसायटीतील वीज मीटरला आग; दोन मोटारींसह दुचाकी जळाल्या – सविस्तर बातमी
वेदांत राहुल कामठे (वय १९), आकाश तुकाराम मुंडे (वय २४, दोघे रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. सुहास गवळी (वय ३६, रा. फुरसुंगी, हडपसर-सासवड रस्ता) यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, वेदांत कामठे हा भारतीय जनता पक्षाचे उमेदवार राहुल यांचा मुलगा आहे. गवळी हे निवडणूक आयोगाच्या पथकात नियुक्तीस आहेत. निवडणूक काळात या पथकाकडून आचारसंहिता पालन, तसेच उमेदवारांच्या खर्चावर लक्ष ठेवण्याचे काम केले जाते. सोमवारी रात्री फुरसुंगी परिसरात तपासणी नाक्यावर गवळी नियुक्तीस होते. पुणे-सोलापूर महामार्गावरुन फुरसुंगीकडे भरधाव मोटार निघाली होती. मोटारीला तपासणी नाक्यावर थांबविण्यात आले. मोटारीची तपासणी करण्यात आली. तेव्हा मोटारीत मद्याच्या बाटल्या सापडल्या. मद्याच्या बाटल्यांबाबत पथकातील कर्मचाऱ्यांनी विचारण केली. तेव्हा दोघांनी समाधानकारक उत्तर दिले नाही. बेकायदा मद्य वाहतुकीचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांचे पथक घटनास्थळी पाेहोचले. मोटारीसह मद्याच्या बाटल्या जप्त करण्यात आल्या.
‘याप्रकरणी आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोटारीसह मद्याच्या बाटल्या असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे’, असे फुरसुंगी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अमोल मोरे यांनी सांगितले.


























