एसबीआयला ८१ कोटी ६६ लाखांचा गंडा
marathinews24.com
पुणे – स्टेट बँक ऑफ इंडिया (एसबीआय)ची तब्बल ८१ कोटी ६६ लाख रुपयांची फसवणूक केल्याच्या आरोपावरून केंद्रीय अन्वेषण विभागाने (सीबीआय) ‘मेसर्स आज का आनंद पेपर्स प्रायव्हेट लिमिटेड’ कंपनीसह संचालक आणि अज्ञात व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन सीबीआयने गुरुवारी पुण्यातील पेपर कार्यालय आणि संचालकांशी निवासस्थानी एकाचवेळी छापे टाकले. कारवाईत संशयास्पद कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे हाती लागल्याने आर्थिक गैरव्यवहाराच्या तपासाला वेग आला आहे.
एसबीआयच्या मुंबई शाखेने दिलेल्या तक्रारीनंतर सीबीआयने कारवाई केली. बँकेची फसवणूक, गुन्हेगारी कट, विश्वासघात तसेच आर्थिक व्यवहारांच्या नोंदींमध्ये फेरफार करून बँकेचे ८१ कोटी ६६ लाख रुपयांचे नुकसान केल्याचा आरोप ठेवला आहे. कंपनीच्या व्यवसायातून मिळणाऱ्या महसुलात गैरव्यवहार करणे, लेखा पुस्तकांमध्ये आणि इलेक्ट्रॉनिक नोंदींमध्ये फेरफार करणे, बँकांच्या समूहाची (कन्सोर्टियम) पूर्वपरवानगी न घेता बाहेरील चालू खात्यांमध्ये निधी वळवणे, असे गंभीर आरोप तक्रारीत केले आहेत. कर्ज मंजूर करताना घालून दिलेल्या अटी व शर्तींचा भंग झाल्याचेही तपास यंत्रणेचे म्हणणे आहे. बँकेकडून घेतलेल्या कर्जाचा विनियोग नेमका कसा करण्यात आला, निधी कोणत्या खात्यांमध्ये वळवण्यात आला आणि या व्यवहारांमध्ये आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास आता सीबीआयकडून केला जात आहे.
पुण्यातील विविध ठिकाणी छापे टाकून सीबीआयने कंपनीचे कार्यालय आणि संचालकांशी संबंधित निवासी ठिकाणांची झाडाझडती घेतली. यावेळी मिळालेली कागदपत्रे आणि डिजिटल पुरावे तपासासाठी ताब्यात घेण्यात आल्याची माहिती आहे. जप्त केलेल्या पुराव्यांच्या आधारे आर्थिक व्यवहारांची साखळी, कथित निधी वळवण्यामागील पद्धत आणि या प्रकरणातील इतर संभाव्य सहभागींची माहिती मिळवण्याचा प्रयत्न सुरू आहे. या तपासातून आणखी काही आर्थिक गैरव्यवहार उघडकीस येतात का, याकडे लक्ष लागले आहे. दरम्यान, संबंधित कंपनीचे संचालक आणि इतर व्यक्तींची भूमिका तपासातून स्पष्ट होणार असून, सीबीआयचा पुढील तपास सुरू आहे.























