फटाके फोडताना काळजी घेण्याचे आवाहन
marathinews24.com
पुणे – Diwali Eye Safety Tips : दिवाळीचा आनंद साजरा करताना फटाक्यांमुळे डोळ्यांना होणाऱ्या संभाव्य दुखापतींकडे दुर्लक्ष करू नका. फटाक्यांच्या ठिणग्या, उष्णता आणि उडणाऱ्या तुकड्यांमुळे डोळ्यांना गंभीर इजा होऊन काही वेळा कायमस्वरूपी दृष्टी गमावण्याची वेळ येऊ शकते. त्यामुळे फटाके फोडताना योग्य खबरदारी घ्यावी. लहान मुलांच्या सुरक्षिततेला प्राधान्य द्यावे, असे आवाहन डॉ. दूधभाते नेत्रालय आणि रेटिना सेंटरचे वरिष्ठ नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. अनिल दूधभाते यांनी केले आहे.
पायल झांबरे आत्महत्या प्रकरणात सासू-सासरा अटकेत – सविस्तर बातमी
फटाके पेटवणाऱ्या व्यक्तींसोबतच जवळ उभ्या असलेल्या नागरिकांनाही त्याचा धोका असतो. विशेषतः लहान मुलांना फटाक्यांपासून दूर ठेवणे आवश्यक आहे. फुलबाज्यांसारखे फटाकेही पूर्णपणे सुरक्षित नसून त्यातून उडणाऱ्या ठिणग्या आणि निर्माण होणाऱ्या उष्णतेमुळे डोळ्यांना इजा होऊ शकते. फटाके फोडताना सुरक्षित अंतर राखावे, शक्यतो संरक्षणात्मक चष्मा वापरावा. लहान मुलांना फटाके हाताळू देऊ नयेत. न पेटलेले किंवा अर्धवट जळालेले फटाके पुन्हा पेटवण्याचा प्रयत्न करू नये. फटाक्यांवर वाकून पाहणे किंवा हातात धरून ते पेटवणे टाळावे. गर्दीच्या ठिकाणी अथवा इतर व्यक्तींच्या दिशेने फटाके उडवू नयेत, अशी सूचनाही डॉ. दूधभाते यांनी केली.
फटाक्याची ठिणगी किंवा तुकडा डोळ्यात गेल्यास डोळा चोळू नये किंवा त्यावर दाब देऊ नये. डोळ्यात रुतलेला तुकडा स्वतः काढण्याचा प्रयत्न करू नये. भेदक जखमेची शक्यता असल्यास डोळा पाण्याने धुणे टाळून तातडीने नेत्ररोगतज्ज्ञांकडे जावे. Diwali Eye Safety Tips डोळ्यात रसायन पडल्यास मात्र त्वरित भरपूर स्वच्छ पाण्याने धुऊन वैद्यकीय मदत घ्यावी. डोळा दुखणे, लाल होणे, सतत पाणी येणे किंवा दृष्टी धूसर होणे ही लक्षणे दिसल्यास वेळ न घालवता तपासणी करून घ्यावी. दिवाळी हा प्रकाशाचा सण आहे. क्षणिक आनंदासाठी आयुष्यभराची दृष्टी धोक्यात घालू नका. स्वतःच्या आणि इतरांच्या डोळ्यांची काळजी घेऊन सुरक्षित दिवाळी साजरी करा असे आवाहन डॉ. अनिल दूधभाते यांनी केले.




















