विद्यापीठ पोलिसांकडून दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल
marathinews24.com
पुणे – स्वस्तात सोने देण्याच्या आमिषाने ज्येष्ठ महिलेची १ कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांकडून दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ज्येष्ठ महिलेने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हेमंत दत्तात्रय खरोटे (वय ४५), रुपाली हेमंत खरोटे (वय ३८, रा. शिवशंभोनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आभासी चलनात गुंतवणुकीच्या आमिषाने १२ लाखांची फसवणूक – सविस्तर बातमी
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार ६१ वर्षीय महिला कात्रज भागातील एका सोसायटीत राहायला आहेत. आरोपींशी त्यांची ओळख होती. दोन वर्षांपूर्वी आरोपी दाम्पत्याने त्यांना स्वस्तात सोने मिळवून देतो, असे आमिष दाखविले. त्यानंतर त्यांना मोबाइलवरुन सोन्याचे बिस्कीट, तसेच दागिन्यांची छायाचित्रे पाठविली. ‘सोन्याचा सध्या दर कमी आहे. येत्या काही दिवसात सोन्याचे दर वाढणार आहे. गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल’, असे आमिष त्यांना आरोपींनी दाखविले. तक्रारदार महिला आणि त्यांच्या पतीला सोन्यात गुंतवणूक करण्यास सांगितले. त्यानंतर त्यांच्याकडून वेळोेवेळी एक कोटी ४९ लाख ९५ हजार रुपये घेतले. आरोपींनी त्यांना सात लाख २३ हजार रुपयांचे सोने, तसेच सात लाख ९० हजार रुपये दिले. त्यानंतर त्यांना उर्वरित रक्कम, तसेच स्वस्तात सोने मिळवून दिले नाही. परतावा न मिळाल्याने ज्येष्ठ महिला आणि पतीने नुकतीच पोलिसांकडे तक्रार दिली. आरोपी दाम्पत्याने एक कोटी ३४ लाख रुपयांची फसवणूक केल्याचे ज्येष्ठ महिलेने फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक भोसले तपास करत आहेत.
























