वानवडी पोलिसांकडून ६ जणांना अटक, ५ लाखांचा ऐवज जप्त
marathinews24.com
पुणे – ऐन दिवाळीत पैशांवर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळणाऱ्या टोळक्याचा वानवडी पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. कारवाईमध्ये पोलिसांनी ६ रंगीबेरंगी कोंबडे, ६ तंगुस पिशव्या, ३ दुचाकी, ५ मोबाईल, रोकड मिळून ५ लाख १२ हजारांचा ऐवज जप्त केला आहे.
पुण्यात ऐन दिवाळीत दुचाकीस्वार चोरटे सुसाट – सविस्तर बातमी
अमोल सदाशिव खुर्द (रा. रविवार पेठ) मंगेश आप्पा चव्हाण (रा. भवानी पेठ) निखिल मनिष त्रिभुवन (रा. घोरपडी) अमिर आयुब खान (रा. घोरपडीगाव) सचिन सदाशिव कांबळे (रा. भवानी पेठ) प्रणेश गणेश पॅरम (रा. कॅम्प, पुणे) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.
कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने वानवडी पोलिसांचे तपास पथक १९ ऑक्टोबरला हद्दीत पेट्रोलिंग करत होते. त्यावेळी पोलीस अंमलदार गोपाळ मदने आणि अमोल पिलाणे यांना घोरपडीमधील इम्प्रेस गार्डनच्या मागे काहीजण पैशांवर कोंबड्यांची झुंज लावून जुगार खेळत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार पोलिसांनी दोन पथके तयार करून त्याठिकाणी छापा टाकला. त्यावेळी पैशांवर कोंबड्यांची झुंज लावताना ६ जण मिळून आले. त्यांच्याकडून कोंबडे, रोकड, असा पाच लाखांवर ऐवज जप्त केला आहे.
आरोपींविरुद्ध वानवडी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जुगार प्रतिबंधक कायदा कलम १२(ब) आणि प्राण्यांवर क्रूरतेचा प्रतिबंध अधिनियम कलम १९(इ)(न) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त आयुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक पोलीस आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक भाऊसाहेब पाटील, पोलीस निरीक्षक (गुन्हे) विजयकुमार डोके यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक उमाकांत महाडिक, दया शेगर, महेश गाढवे, अमोल पिलाणे, अतुल गायकवाड, अभिजित चव्हाण, यतीन भोसले, आशिष कांबळे, गोपाळ मदने, बालाजी वाघमारे, विष्णु सुतार, अमोल गायकवाड, विठ्ठल चोरमले, अर्षद सय्यद, सुजाता फुलसुंदर यांनी केली.



















