राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट – उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

राज्याच्या औद्योगिक धोरणावर जागतिक पातळीवरील विश्वास अधिक बळकट - उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार

बारामतीच्या औद्योगिक विकासाला गती; उद्योग आणि रोजगाराच्या नव्या संधी; उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते बारामती येथे गेटझनर इंडिया प्रा. लि. च्या उत्पादन प्रकल्पाचे उद्घाटन

marathinews24.com

बारामती – गेटझनर इंडिया प्रा. लि. च्या उत्पादन प्रकल्पामुळे राज्याच्या औद्योगिक धोरणावर आणि गुंतवणूकस्नेही वातावरणावर जागतिक स्तरावरील विश्वास अधिक बळकट होत असल्याचे दिसून येते. या प्रकल्पामुळे स्थानिक तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार असून उद्योजकांनाही नवे अवसर मिळतील. त्यामुळे बारामतीच्या औद्योगिक विकासाला निश्चितच गती मिळेल, असा विश्वास राज्याच्या उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी व्यक्त केला.

अनुसूचित जातींच्या युवक-युवतींसाठी सात अभ्यासक्रमांचे तीन महिन्यांचे मोफत प्रशिक्षण – सविस्तर बातमी 

महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या परिसरात गेटझनर इंडिया प्रा. लि. च्या उत्पादन प्रकल्पाच्या उद्घाटनप्रसंगी त्या बोलत होत्या. यावेळी ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झीग, एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील, नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातव, एममायडीचे कार्यकारी अभियंता विजय पेठकर, बारामती औद्योगिक वसाहत संघटनेचे अध्यक्ष धनंजय जामदार, गेटझनर ऑस्ट्रियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी युर्गेन राईनआल्टर, माजी अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. उज्वल उके, इबीजी फेडरेशनचे चेअरमन रमणसिंग सिधू, गेटझनरचे निवासी संचालक संजय रिसबुड आदी उपस्थित होते.

पवार म्हणाल्या की, दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार हे अत्याधुनिक आणि जागतिक दर्जाचे उद्योग राज्यात आणण्यासाठी नेहमीच आग्रही असत. त्यांच्या दूरदृष्टी आणि विशेष प्रयत्नांमुळे गेटझनर इंडिया प्रा. लि. चा हा उत्पादन प्रकल्प बारामती येथे उभारण्यात आला आहे. हा प्रकल्प थेट परकीय गुंतवणुकीतून साकारला असून देशांतर्गत उत्पादन क्षमता वाढवणे, आयातीवरील अवलंबित्व कमी करणे तसेच ‘मेक इन इंडिया’ आणि ‘आत्मनिर्भर भारत’ या संकल्पनांना बळकटी देणे हा त्यामागील मुख्य उद्देश आहे.

या प्रकल्पामध्ये अद्ययावत पीयू मोल्डिंग तसेच दुय्यम प्रक्रिया सुविधा उपलब्ध आहेत. येथे उत्पादित होणारी उत्पादने विशेषतः मेट्रो प्रकल्पांसाठी वापरण्यात येणार आहेत. ही उत्पादने आयातपर्यायी असल्याने परकीय चलनाचीही बचत होणार आहे. येथून अधिकाधिक दर्जेदार आणि गुणवत्तापूर्ण उत्पादने विकसित होतील, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. प्रकल्प उभारणीच्या कामात एमआयडीसी, महावितरण आदी विभागांचे विशेष सहकार्य लाभल्याचेही त्यांनी नमूद केले.

बारामती ही कृषी व आरोग्य क्षेत्रासाठी ओळखली जाणारी भूमी असली, तरी आता ती आधुनिक उद्योगनगरी म्हणूनही उदयास येत आहे. परिणामी राज्याच्या आर्थिक विकासालाही गती मिळेल. उद्योगांचा विकास होत असताना पर्यावरणाचा ऱ्हास होणार नाही, याची विशेष दक्षता घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली. इंदापूर तालुक्यातील जंक्शन येथे एमआयडीसीसाठी एक हजार एकर जमीन उपलब्ध झाली असून पुरंदर विमानतळ प्रकल्पासाठीही शासन प्रयत्नशील आहे. प्रकल्प पूर्णत्वास नेण्यासाठी शासन आपल्या पाठीशी खंबीरपणे उभे राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

ऑस्ट्रियाचे राजदूत रॉबर्ट झीग म्हणाले की, भारतामध्ये उद्योगस्नेही व गुंतवणूकपूरक वातावरण उपलब्ध असल्यामुळे अधिकाधिक परकीय गुंतवणूकदार येथे प्रकल्प उभारण्यास उत्सुक आहेत. या प्रकल्पाच्या माध्यमातून दर्जेदार उत्पादनाबरोबरच स्थानिकांना रोजगार देण्याला प्राधान्य दिले जाईल, असे त्यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री पवार यांनी प्रकल्पाची पाहणी करुन उत्पादनाबाबत माहिती घेतली.

यावेळी प्रकल्प उभारणीच्या कार्यात योगदान दिल्याबद्दल नगरपरिषदेचे अध्यक्ष सचिन सातव आणि एमआयडीसीचे प्रादेशिक अधिकारी हनुमंत पाटील यांचा सन्मान करण्यात आला.

व्हिडीओ

  • Video Not Found!!
  • Error Code : 429
  • Message : Quota exceeded for quota metric 'Search Queries' and limit 'Search Queries per day' of service 'youtube.googleapis.com' for consumer 'project_number:240959846937'.
error: Content is protected !!
Scroll to Top
×